शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी आता हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी नागपुरात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अयोध्येतील राम मंदिर उभारणीबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी प्रवीण तोगडियांनी केली आहे. राम मंदिर आंदोलनात ज्यांचा महत्त्वाचा सहभाग होता अशा चारजणांचा गौरव केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. नागपुरातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशात गेल्या अनेक वर्षांपासून धगधगणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर वादासंदर्भात सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला. या निकालामुळे अयोध्येतील राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टची घोषणा केली. ज्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन प्रवीण तोगडियांनी बाळासाहेब ठाकरेंसह चार जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी कधीही तडजोड केली नाही. राम मंदिर आंदोलनाला नेतृत्व देण्याचं कामही त्यांनी केलं आणि हिंदूंमध्ये नवचेतना जागवली त्यामुळे त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा” अशी मागणी तोगडियांनी केली आहे.

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे अशी मागणी होत असतानाच आता प्रवीण तोगडियांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली आहे. आता या मागणीचा विचार सत्ताधारी पक्षाकडून केला जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.