शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला. आता त्यालाच प्रत्युत्तर म्हणून प्रविण दरेकरांनी नवं ट्विट केलं आहे. तुम्ही शिवभोजन थाळी द्याल तर आम्ही तुम्हाला भंडाऱ्यात बसवण्याची व्यवस्था करु अशा शब्दात त्यांनी राऊतांना सुनावलं आहे.

“शिवप्रसादमध्ये शिवला अभिप्रेत असणारे काम आमच्या पक्षाकडून सुरु आहे आणि प्रसादपण आमच्याकडे आहे. शिवभोजनाची थाळी जेव्हा द्यायची तेव्हा द्या, पण आम्ही काय तोंडाला पट्टी लावून बसलो नाही. आम्ही जर भंडाऱ्याची व्यवस्था केली तर तुम्हालाही पंक्तीला बसावं लागेल”, असं प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिलं आहे. शिवसेना भवन येथील कालच्या राड्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असं विधान केलं होतं.


“संजय राऊत दोन्ही बाजूने आपले मत मांडत आहेत. एका बाजूने कालचा विषय संपला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने शिवप्रसाद आणि शिवथाळी देण्याच्या गोष्टी करायच्या. शिवसेनेचे हिंदुत्व, देव, दैवत याविषयीच्या भूमिका पातळ होत आहेत. तुमच्या शिवथाळीपेक्षा आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था करू म्हणजे थोडं पुण्य आमच्या पदरी पडेल. आम्ही मूग गिळून बसणाऱ्यामधले नाही”, असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला.

हेही वाचा- ‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका; हाणामारीवरुन संजय राऊतांचा भाजपाला इशारा

“राऊत यांनी शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीमध्ये वेळ वाया घालवू नये. वाझे जेलमध्ये असून आता प्रदीप शर्मा देखील जेलमध्ये जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भत्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेचे मंत्री वाझेंसाठी अधिवेशनात भांडत होते. मुख्यमंत्रीही त्याची बाजू घेत होते. वाझे काय लादेन आहे का? असं मुख्यमंत्री म्हणत होते. मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए काम करत आहे. सगळ्या संशयाच्या सुया एकाच दिशेनं जात आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणात आधी लक्ष द्यायला हवे, भोजन तर भंडाऱ्यात तुम्हाला जेवायचेच आहे”, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.