दिगंबर शिंदे

ज्या वास्तूमध्ये अजरामर गीतांचा जन्म झाला, कथाबीजे अंकुरली, चित्रपट कथांबरोबरच लावण्यांच्या शब्दांनी ताल धरला, अशा माणदेशीचे शब्दप्रभु गदिमांची माडगुळातील ‘बामणाचा पत्रा’ वास्तू आता नवं रूपडं घेऊन साहित्य प्रेमींच्या स्वागताला सज्ज झाली आहे.

अनेक अजरामर गीतांनी मराठी साहित्य शारदेच्या अंगणात मुक्त वावरलेल्या गदिमांचे आटपाडीतील माडगूळ हे गाव. त्यांचा जन्म आटपाडी तालुक्यातीलच शेटफळे येथे झाला असला तरी त्यांचे वास्तव्य मात्र माडगूळ गावी राहिले. यातही लेखनापासून ते विश्रांतीपर्यंत त्यांनी आपला मुक्काम गावातील रानात असलेल्या घरात थाटला होता. मराठी साहित्यात ग्रामीण चित्रण उभे करणारे व्यंकटेश माडगूळकरही याच घरामध्ये मुक्कामाला असत. अनेक विख्यात साहित्यकृतींना जन्म देणारी ही वास्तू परिसरात आणि पुढे मराठी साहित्यात ‘बामणाचा पत्रा’ या नावाने अजरामर झाली.

कौलारू घर, घरामागे असलेले लिंबाचे झाड, मोट असलेली विहीर हे या ‘बामणाचा पत्रा’ नावाच्या स्थळाचे वर्णन. गदिमांच्या साहित्यात देखील या खाणाखुणा उमटलेल्या. हे सारे आजही उभे आहे. परंतु मध्यंतरी घर थोडेसे मोडकळीस आले होते. तातडीने दुरुस्तीची गरज होती. अशा वेळी गदिमांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्थळाचा विकास होण्याची आशा निर्माण झाली. मात्र शासन स्तरावरून काहीच हालचाली होत नसल्याचे लक्षात येताच पुतणे मुक्तेश्वर माडगूळकर यांनी अण्णांच्या आठवणी जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आणि ‘बामणाच्या पत्र्या’चा कायापालट घडला.

गदिमांची प्रतिभा जिथं नांदती होती, त्या स्थळावर भेट देण्यासाठी, पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्यप्रेमी येतात. त्या वेळी या वास्तूची ही अवस्था पाहून अनेक जण खंत व्यक्त करायचे. वास्तविक गदिमांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या स्मारकाचा विकास होईल असे वाटले होते, मात्र तसे काही घडले नाही. अखेर आम्ही माडगूळकर कुटुंबीयांनी हा विकास घडवून आणला आहे. या वास्तूमध्ये आता गदिमांचे साहित्य, पुस्तके ठेवली जाणार आहेत. त्यांच्या ‘गीत रामायणा’ची देखील ‘डिजिटल’ स्वरूपात भेट घडवली जाणार आहे.

– मुक्तेश्वर माडगूळकर

बदल काय? मूळ घराच्या रचनेला कुठलाही धक्का न लावता विकासाचे हे काम करण्यात आले आहे. घराच्या भिंती, छताची दुरुस्ती करण्यात आली आहे. भिंतींना गिलावा लावण्यात आला. रंगरंगोटीही करण्यात आली आहे. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. नवे रूप घेतलेल्या या वास्तूत अण्णांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे छायाचित्रही लावण्यात आले. या वास्तूत आता त्यांच्या साहित्याची मांडणी करत गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

‘बामणाचा पत्रा’!

भर उन्हातदेखील या झोपडीच्या दर्शनाने माझे डोळे थंड होतात. केवळ तीनच बाजूला भिंती असल्यामुळे झोपडीचे स्वरूप एखाद्या धर्मशाळेसारखे दिसते. पाठभिंतीला असलेल्या खुंटय़ावर नाडा, सौंदर, सापत्या इत्यादी शेतीच्या वस्तू लटकत असतात. कोनाडय़ातून बी-बियाणांची गाडगी मृगाची वाट पाहात थांबलेली असतात. मी तिथे गेलो की तिथल्या या वस्तू अदृश्य होतात. खुंटय़ावर कडक इस्त्रीचे सदरे, कोट, जाकिटे लटकू लागतात. कोनाडय़ातल्या बियाणांच्या जागा संदर्भग्रंथ घेतात. गोठा म्हणून बांधलेल्या या जागेवर गादी-तक्क्यांची शुभ्र बैठक ठाण मांडते. तसूतसूने वाढत असलेल्या पिकाला आणि उगवत्या-मावळत्या नारायणाला साक्षी ठेवून मी येथे माझे लेखन सुरू करतो. ही झोपडी केवळ निवासस्थान नाही, तर स्फूर्तिस्थान आहे. पाठीमागे चालणारी मोटेची घरघर, अवतीभवती प्रत्यक्ष बहरताना दिसणारे हिरवे जीवन.. ईश्वरी निर्मितीचा अद्भुत साक्षात्कारच तिथे होत होता! धान्याच्या बीजाप्रमाणे या भूमीत कथाबीजेदेखील अंकुरित होतील असे वाटले.

(ग. दि. माडगूळकर यांच्या ‘मंतरलेले दिवस’ या साधना प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)