समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती ऑनलाइन केल्यामुळे गैरप्रकारास अटकाव होऊन लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही घट झाली आहे.
विभागामार्फत अनेक शिष्यवृत्तींचे वितरण केले जाते. एका विद्यार्थ्यांला एकाच शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. हा नियम टाळून एकाच विद्यार्थ्यांकडून अनेक शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचे प्रकार घडत. ऑनलाइन पद्धतीमुळे त्याला आळा बसून लाभार्थीची संख्या घटली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा देताना ऑनलाइन पद्धतीमुळे शिष्यवृत्ती वितरणातील अनेक गैरप्रकारांना पायबंद झाल्याची माहिती दिली. जि.प.च्या समाजकल्याणमार्फत सावित्रीबाई फुले, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या पाल्यांसाठी व मॅट्रिकपूर्व अशा तीन शिष्यवृत्तींचे वितरण केले जाते.
यातील सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती गेल्या वर्षीपासून ऑनलाइन करण्यात आली. त्यामध्ये पाचवी ते सातवीच्या मुलांना दरमहा ६०० रुपये तर आठवी ते दहावीच्या मुलांना १ हजार रुपये वितरित केले जातात. तर अस्वच्छ व्यवसायातील व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती यंदापासून ऑनलाइन करण्यात आली. मॅट्रिकपूर्वसाठी दरमहा २ हजार २५० तर अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या पाल्यांसाठी दरमहा १ हजार ८५० रुपये शिष्यवृत्ती मिळते.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी दोन वर्षांपूर्वी शाळांमध्ये हाताने अर्ज भरून दिले जात, त्या वेळी सन २०१२-१३ मध्ये लाभार्थीची संख्या ३६ हजार ३९६ होती. त्यासाठी सुमारे १ कोटी ९४ लाख रुपये वितरित करण्यात आले. हीच संख्या गेल्या वर्षी ऑनलाइन झाल्यावर २२ हजार ६४१ झाली. त्यांना सुमारे १ कोटी ८१ लाख रुपये वितरित करण्यात आले. गेल्या वर्षी अस्वच्छ व्यवसायातील ३ हजार ७८३ पाल्यांना ७० लाख रुपये वितरित करण्यात आले. यंदा ऑनलाइन झाल्यावर १ हजार ८५० अर्ज प्राप्त झाले आहेत. हीच परिस्थिती मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी आहे. गेल्या वर्षी १ हजार ३४४ जणांना ३० लाख ६२ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती ऑनलाइन करण्यापूर्वी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांलाच मिळते का याची खात्री नसे. त्यासाठी तपासणी करणारी यंत्रणा नव्हती. काही वेळेला बनावट विद्यार्थ्यांचेही प्रस्ताव येत. एका विद्यार्थ्यांला एकाच शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याचे बंधन होते. दुबार लाभ घेणाऱ्यांची तपासणी झाली नाही. याला ऑनलाइनमुळे अटकाव झाला आहे. शिष्यवृत्तीसाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरावेत. पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. काही अडचण असल्यास कार्यालयातील कर्मचारी सुदेश शिवलेकर (मो. ९१७५८०९००९) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आहे.