प्रशांत देशमुख

शालेय पातळीवर आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान नाटय़ोत्सव उपक्रमात महात्मा गांधी यांच्या विज्ञानविषयक दृष्टिकोनास अग्रक्रम देण्यात आला आहे.

नेहरू विज्ञान केंद्र व शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०१९-२० च्या नाटय़ोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान नाटय़ोत्सव अंतर्गत करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक तसेच जनसामान्यांना विज्ञानविषयक घटना आणि संकल्पना मनोरंजक पद्धतीने सांगण्याचा हेतू आहे. नाटय़ातून विज्ञान लोकप्रिय करण्यासोबतच समाज प्रबोधनही करण्याचे उद्दिष्ट आहे. नाटय़ोत्सवाचा मुख्य विषय विज्ञान आणि समाज हा असून गांधी आणि विज्ञान हा उपविषय अग्रभागी आहे. गांधीजींच्या दीडशेव्या जयंती पर्वावर गांधीजींचे विज्ञानविषयक विचार सर्वत्र पोहोचवण्याचा हेतू यामागे आहे. तसेच स्वच्छता आणि आरोग्य, आवर्त सारणी व हरित आणि स्वच्छ ऊर्जा हे अन्य तीन उपविषय आहेत. १६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर जिल्हास्तरावर, २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर विभागीय स्तरावर व २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर नाटय़ोत्सवाचे आयोजन होणार आहे. प्रत्येक जिल्हय़ात तालुका स्तरावरसुद्धा या उपक्रमाचे आयोजन अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. राज्यस्तरीय विज्ञान नाटय़ोत्सवाचे आयोजन नागपूरच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेतर्फे  होईल. सहावी ते दहावी दरम्यान शिकणारे विद्यार्थी अध्र्या तासाच्या अवधीत नाटय़ सादर करतील. एका चमूत कमाल आठ विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. नाटय़ सादरीकरणास ५० गुण, वैज्ञानिक माहिती ३० गुण व परिणामकारकतेवर २० गुण दिले जाते. राज्यस्तरावर सहभागी झालेल्या प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या चमूतील विद्यार्थ्यांचा प्रवास व दैनिक भत्ता आयोजकांतर्फे  मिळणार असून शिक्षकांचा खर्च शाळेला करायचा आहे.