राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुर्लक्षित झालेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक आगामी विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांनी कृषक समाज व राष्ट्रीय कामगार संघटना (नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन) या दोन संघटनांना पुन्हा चालना देण्याचा निर्णय जाहीर केला. या दोन्ही संघटनांच्या पदाधिका-यांचे राज्यस्तरीय शिबिर येत्या ऑगस्टमध्ये देवगड (ता. नेवासे) येथे घेण्याचेही जाहीर केले.
राष्ट्रवादीसह काँग्रेस व इतर सर्वच राजकीय पक्षांचे शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतक-यांच्या आत्महत्येकडे सत्ताधारी व विरोधकही त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. आपण काँग्रेसमध्ये असताना व सध्या राष्ट्रवादीत असताना दोन्ही पक्षांच्या व्यासपीठावर शेतकरी व कामगारांचे प्रश्न उपस्थित केले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न अजेंडय़ावर घ्यावा यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
आपली भूमिका सरकारविरोधी नाही, आपण केवळ शेतकरी व कामगारांच्या मागण्या मांडणार आहोत. त्यासाठी सरकारच्या विरोधात वैचारिक पातळीवर, लोकमत जागृत करून संघर्ष करू. लोकमत जागृत झाल्यास काय घडते हे लोकसभा निवडणुकीत दिसलेच आहे, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. मात्र आपण विधानसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून ही भूमिका घेत असल्याचा त्यांनी इन्कार केला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचा झालेला पराभव किंवा मोदींना मिळालेले यश याबद्दल चर्चा करण्यासारखे काही नाही. पक्षीय पातळीवर त्याचे विश्लेषण केले जाईल. आपल्याला त्याबद्दल काही बोलायचे नाही. लोकमताचा आदरच करण्याची आपली भूमिका आहे. मोदींबद्दल लोकांच्या खूपच अपेक्षा आहेत. मात्र त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास अवधी द्यावा लागेल, लगेच मूल्यमापन करणे शहाण्या लोकशाहीचे लक्षण नाही, असे आदिक म्हणाले.
राष्ट्रवादीकडून दुर्लक्ष नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा तसेच त्यासाठीच कृषक, कामगार संघटना सक्रिय करत असल्याचा गोविंदराव आदिक यांनी इन्कार केला. पुढील रूपरेषा देवगडच्या दोन दिवसांच्या शिबिरानंतर स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेपूर्वी आदिक यांनी दोन्ही काँग्रेसमधील पदाधिका-यांशी बंद खोलीत चर्चा केली. त्या वेळी दादा कळमकर, विनायक देशमुख, वसंतराव मनकर, डॉ. एकनाथ गोंदकर, डॉ. रावसाहेब अनभुले, डी. एम. कांबळे, अप्पासाहेब कदम, संपत मेमाणे, उबेद शेख, राधाकृष्ण वाळुंज आदी उपस्थित होते.
‘मीसुद्धा वंचित!’
गारपीटग्रस्त अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले तसेच आपणही वंचित आहोत. आपल्या बेलापूर इंडस्ट्रीज कंपनीची हरेगाव येथील ५० एकर द्राक्षबाग गारपिटीत उद्ध्वस्त झाली. सुमारे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले, परंतु अद्याप भरपाई मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षाच्याच राष्ट्रीय सरचिटणिसाची ही अवस्था तर सामान्य शेतक-यांची काय परिस्थिती असेल, याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी सरकार निर्णय घेते, मात्र यंत्रणा व्यवस्थित अंमलबजावणी करत नाही, अशी टीका केली.