निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावरील एक्स्प्रेस कालव्याच्या दरवाजांची कुलपे तोडून पाणी सोडल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या औरंगाबादमधील ८४ शेतकऱ्यांची शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या या घटनेनंतर नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर दंगा नियंत्रण पथकासह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांमधील ६९ गावांमधून गेल्या तीन दिवसांपासून पिण्याचे पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. पाणीटंचाईमुळे हैराण झालेले वैजापूर तालुक्यातील सुमारे २०० आंदोलक टेम्पो, जीप आदी वाहनांद्वारे शुक्रवारी निफाड तालुक्यातील या बंधाऱ्यावर जमा झाले आणि त्यांनी एक्स्प्रेस कालव्याच्या दरवाजांचे टाळे तोडले. यामुळे जवळपास दोन तास दरवाजांमधून लाखो लिटर्स पाणी वाहून गेले. पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे दरवाजे पुन्हा बंद केले. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ८४ आंदोलकांना अटक करण्यात आली होती. या आंदोलकांना शनिवारी निफाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर संबंधिताचा जामीन अर्जही मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यावर ६० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकही तैनात केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाबूराव निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर हा बंधारा नाशिक व नगरच्या सरहद्दीवर आहे. या बंधाऱ्यावरील एक्स्प्रेस कॅनॉल व गोदावरी डावा तट कालव्यातून वैजापूर (औरंगाबाद) व नगर जिल्ह्यात पाणी दिले जाते. हा बंधारा संवेदनशील असल्याचे लक्षात घेत पोलीस यंत्रणेने कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.