26 October 2020

News Flash

राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

“आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

“शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ कोटी ५० लाख शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जय जवान, जय किसान, जय कामगार

किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगारदेखील उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे पहिले राज्य

ऑनलाईन शिक्षण सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

१६ हजार कोटींचे करार

“अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात सध्या सुमारे ५० ते ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत. उद्योग क्षेत्रात १२ देशांमधील गुंतवणुकदारांसोबत सुमारे १६ हजार कोटीं रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत,” असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हेच कोविड योद्धे

“करोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स, नर्सेस, इतर वैद्यकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हेच खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 2:41 pm

Web Title: providing better health facilities in the state is the top priority cm uddhav thackeray speech independence day jud 87
Next Stories
1 स्वातंत्र्य दिनी साताऱ्यात खळबळजनक घटना; पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा…
2 स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला तिरंगी फुलांची सजावट
3 राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील करोनाबाधित
Just Now!
X