माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्याविरोधात आज(दि.21) पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात घोषणाबाजी करण्यात आली. कोळसे-पाटील फर्ग्युसन महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोळसे-पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने कोळसे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विरोध करणाऱ्या गटाने फर्ग्युसनच्या कँपसमधील रस्त्यांवर ‘कोळसे पाटील गो बॅक’, ‘राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार’ अशाप्रकारचे अनेक संदेश लिहून विरोध दर्शवला. एकीकडे विरोध सुरू असतानाही कोळसे-पाटील यांनी इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते महाविद्यालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर ताशेरे ओढले.

आज(दि.21) दुपारी 12 वाजता बी.जी.कोळसे पाटील यांचे व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी थिएटर मध्ये आयोजित करण्यात आले होते. कोळसे पाटील भारतीय राज्यघटना या विषयावर व्याख्यान देणार होते. परंतु शनिवारी अचानक या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आणि महाविद्यालयात तणाव निर्माण झाला. संस्थेने परवानगी नाकारल्यावरही व्याख्यान घेण्यावर विद्यार्थ्यांचा एक गट ठाम होता. तर अभाविपने कोळसे-पाटील यांना विरोध दर्शवला होता. परिणामी पोलिसांनी महाविद्यालयात आधीच कडोकोट बंदोबस्त ठेवला होता. यामुळे दोन्ही गट आमनेसामने येण्यापासून रोखता आले.

दुसरीकडे, ‘महाविद्यालयाचे डीन यांच्याकडून नजरचुकीने कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, ते लक्षात येताच आम्ही शनिवारी विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली परवानगी नाकारली नाही’ असं डेक्कन एज्युकेशन नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे म्हणाले.