जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीररित्या जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाचे अधिकारी या घटनेची चौकशी करतील. ज्या एजन्सीला हे काम देण्यात आले होते, त्या एजन्सीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा यावेळी रेल्वे प्रशासनाने केला आहे.

या घटनेनंतर मध्य रेल्वेने एक निवेदन प्रसिद्ध केले असून याद्वारे त्यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. कोसळलेले होर्डिंग एका जाहिरात एजन्सीला देण्यात आले होते. या एजन्सीला रेल्वे प्रशासनाने अनेकदा नोटीस देऊनही काही होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केले नव्हते. त्यामुळे या होर्डिंगचा सांगाडा रेल्वे प्रशासनाने काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दुसऱ्या एका एजन्सीला काम दिले होते. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते केल्याने ही दुर्घटना घडली.

दरम्यान, कॅप्शन्स आऊटडोअर अॅडव्हर्टायजिंग या जाहिरात एजन्सीने या अपघातास रेल्वे प्रशासनासलाच जबाबदार धरले आहे. एजन्सीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, होर्डिंग्जचा सांगाडा काढण्यासाठी यापूर्वी रेल्वे प्रशासनाशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही, असे या एजन्सीने म्हटले आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. यातील जखमींना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यांपैकी प्रकृती गंभीर असलेल्या लोकांना ससून रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. एका जखमी मुलीला कमला नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर चांगले उपचार व्हावेत यासाठी रेल्वेचे अधिकारी संबंधीत रुग्णालयांमध्ये उपस्थित आहेत. ससूनमधील जखमींच्या नातेवाईकांशी आणि डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांना चांगल्यात चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

जुना बाजार भागातील शाहीर अमर शेख चौकात अनेक मोठे होर्डिंग लावण्यात आले असून यातील एका होर्डिंगचा मोठा लोखंडी सांगाडा दुपारी सिंग्लला थांबलेल्या वाहनांवर कोसळला. दुपारी लोखंडी होर्डिंगचे कटिंग सुरु असताना ही घटना घडली. या होर्डिंगखाली एकूण ११ जण सापडले होते. यातील चौघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.