28 November 2020

News Flash

वेगळेपणा जपण्याच्या नादात आबा स्वपक्षीयांच्याही निशाण्यावर

गृह खाते भूषविणाऱ्याला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत असले तरी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील मात्र वेगळ्याच कारणामुळे विरोधकांबरोबरच

| September 7, 2013 02:05 am

गृह खाते भूषविणाऱ्याला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत असले तरी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील मात्र वेगळ्याच कारणामुळे विरोधकांबरोबरच स्वपक्षयीकांकडून अलीकडच्या काळात जास्त लक्ष्य होऊ लागले आहेत. वेगळेपणा किंवा स्वत:ची प्रतिमा जपण्याच्या नादात आबांनी स्वपक्षीयांनाही दुखावल्याने त्यांच्याबद्दल पक्षातही तेवढी आपुलकी राहिलेली नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गृह खात्याला घरचा आहेर दिला. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचाच ठपका हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांना हा सूचक इशारा असल्याचे पक्षातच बोलले जाते. आता पक्ष प्रवक्त्याचे हे वैयक्तिक मत आहे की वरिष्ठांच्या आदेशानुसार ते तसे बोलले याबाबत वेगळे मतप्रवाह आहेत. मात्र आर. आर. पाटील यांच्याबाबत पक्षाच्या पातळीवर नाराजीची भावना आहे.
गेल्या वर्षी पुणे बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच गृह खात्याच्या कारभाराबद्दल उघडपणे नापसंती व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार तर गृह खाते किंवा आर. आर. पाटील यांना लक्ष्य करण्याची संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांच्या मनात आर. आर. पाटील यांच्याबाबत असुयेची भावना आहे. त्यांना मिळणारी प्रसिद्धी, त्यांच्याबद्दलचे  लोकांमधील आकर्षण हीदेखील कारणे त्यामागे असल्याचे बोलले जाते. आर. आर. पाटील यांनीही वेगळेपणा जपण्याच्या नादात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना दुखावले आहे. पक्षाचे आमदार किंवा नेत्यांनी केलेल्या शिफारसींची आर. आर. दखल घेत नाहीत, अशी नेहमीची तक्रार असते.
पक्षाचे मंत्री किंवा नेते आर. आर. पाटील यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडत नसले तरी पक्षाध्यक्ष शरद पवार मात्र आबांच्या ठामपणे पाठीशी असतात.  
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर आर. आर. पाटील यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. मात्र त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपावून त्यांचे महत्त्व कायम ठेवण्यात आले. निवडणुकीनंतर आर. आर. पाटील यांच्या मनाप्रमाणे त्यांच्याकडे गृह खाते पुन्हा सोपविण्यात आले. यामुळे पक्षाच्या नेत्यांनी कितीही विरोधात भूमिका घेतली तरीही आर. आर. पाटील यांच्या पदाला काही धोका दिसत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:05 am

Web Title: r r patil on the radar of own party members
टॅग R R Patil
Next Stories
1 नवी मुंबईत पाणी नासाडीची खुशामतखोरी
2 महसूल मिळवून देणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग
3 सरकारी तिजोरीतील खणखणाटाचा प्राध्यापकांच्या थकबाकीला फटका?
Just Now!
X