कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या परदेशात असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी सोमवारी भिवंडी न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ८ मे रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी न्यायालयाच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज या प्रकरणाची सुनावणी होती. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच राहुल गांधी ‘गायब’ आहेत. पक्षाकडून अधिकृतपणे सुटी घेऊन ते दिल्लीतून बाहेर गेले आहेत. ते नक्की कुठे गेले आहेत, याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नाही.
भिवंडीतील या प्रचारसभेदरम्यान, राहुल यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. संघाकडून सादर करण्यात आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या तपासणीनंतर भिवंडी न्यायालयाने राहुल गांधींना हजर राहण्याचे आदेश दिले होते. राहुल गांधी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, उच्च न्यायालयानेही त्यांना याप्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला.