पहिल्या टप्प्यात ९० रुग्णांसाठी सुविधा

पालघर : पालघर जिल्ह्यतील वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीवरून पश्चिम रेल्वेने प्राणवायू पुरवठय़ाची  असलेली रेल्वेगाडी उपलब्ध केली आहे. कोविड विलगीकरणासाठी असलेली ही रेल्वे गाडी पालघर रेल्वे स्थानकात दाखल झाली आहे. गाडीच्या डब्ब्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ९० रुग्णांचा विलगीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या विलगीकरण व्यवस्था असणाऱ्या २३ डब्यांची विशेष गाडी शनिवारी सकाळी पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर दाखल झाली. या गाडीतील प्रत्येक डब्यामध्ये एका बाजूला शौचालय तर दुसऱ्या बाजूला स्नानगृह व बेसिनची व्यवस्था असून प्रत्येक डब्यात दोन प्राणवायू सिलेंडरचा साठा आहे. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार प्राणवायू पुरवठा करण्याची व्यवस्था उपलब्ध असून उन्हाळ्याच्या काळात तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी डब्यांचे छत व खिडक्यामध्ये कूलरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. या विलगीकरण डब्याच्या गाडीत आवश्यक व्यवस्था उभारण्याचे व तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

रेल्वे विलगीकरण डब्यांसंदर्भात पश्चिम रेल्वे आणि जिल्हा प्रशासनात सामंजस्य करार करण्यात आला आहे. विनाोतानुकूलित २३ डब्यांच्या या गाडीतील पाच डब्यांचा पहिल्या टप्प्यात वापर केला जाणार असून प्रत्येक डब्यात १८ रुग्ण दाखल करण्याची व्यवस्था आहे. या कोविड विलगीकरण डब्यांच्या गाडी परिसरातील वैद्यकीय व्यवस्था स्वच्छता, पाणीपुरवठा, खानपानसेवा व इतर काही बाबी जिल्हा प्रशासनाला पुरवण्याच्यादृष्टीने   निश्चित झाले आहे. डब्यांमध्ये पाणी भरण्याची सोय तसेच वैद्यकीय अधिकारी व परिचारिका कर्मचारी नगरपरिषदेतर्फे देण्यात येणार असून रेल्वे विलगीकरण डब्यांमध्ये रुग्ण दाखल करण्याचा दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी सांगिलते. रेल्वे विलगीकरण कक्ष एका डब्याने आरंभ करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले.

या कोविड उपचार केंद्राच्या रेल्वे डब्यांसाठी रेल्वे प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाने रेल्वेकडे  मागणी केली होती. पालघर प्रमाणे डहाणू व वसई येथे याच प्रकारची सुविधा उपलब्ध करून द्यावी या करिता प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेकडे अशा प्रकारचे ३८६ डब्या असून यापूर्वी नंदुरबार, नागपूर व इंदोर येथे करोना रुग्णांच्या उपचारार्थ कार्यरत असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.