विघ्नहर्ता गणराय यंदा आपल्या सोबत पाऊसही घेऊन येत असून तब्बल १० दिवस त्याचा मुक्काम राहणार आहे. निम्मा पावसाळा संपला तरी पाऊस नसल्याने दुष्काळाची भीती व्यक्त केली जात होती. पण आता ते संकटनिवारण होण्याचा अंदाज आहे. पाऊस आणखी काही दिवस राहणार असल्याच्या वृत्तास हवामान विभागाने त्याला दुजोरा दिला आहे.
गेल्या ८ दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी व नेवासे भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिसाच्या किना-यालगत असलेल्या पश्चिम व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात पावसाची स्थिती उत्तम असण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस नगर जिल्ह्यात पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यात आठवडाभर आकाश ढगाळ राहील. कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सियस, किमान तापमान २० ते २१अंश सेल्सियस राहील. तापमान एक अंशाने कमी होईल, वा-याचा वेग ताशी ७ ते १६ किलोमीटर राहील. आर्द्रता ६३ ते ९६ राहील. या सर्व गोष्टी पाऊस पडायला अनुकूल अशाच आहेत.
मागील आठवडय़ात राहुरी व नेवासे तालुक्यात चांगला पाऊस झाला. मुळा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. पण पावसामुळे शेतकरी पाणी घेत नसल्याने आवर्तन बंद केले आहे. मुळा धरणातून आता डाव्या कालव्याला १५० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून त्यातून मुसळवाडी तलाव भरून घेतला जात आहे. मुळा धरणात २० हजार २७० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दररोज १ हजार ३०० ते १ हजार ५०० क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी आहे. मात्र लाभक्षेत्रात पाऊस चांगला पडत आहे. असे असले तरी भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडलेले पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आलेले नाही. संगमनेरला झालेल्या ढगफुटीमुळे ओझर बंधा-यावरून नदीपात्रात ४५७ क्युसेकने पाणी पडत आहे. प्रवरा डावा कालवा ९३१ तर उजवा कालवा २४९ क्युसेकने वाहात आहे. पुढील ८ ते १० दिवस गणरायांबरोबर पावसाचाही मुक्काम राहणार असल्याने शेतीऐवजी बंधारे, तळे व टाकळीभान टेलटँक भरून घेतला जाणार आहे.
ढगाळ हवामानामुळे मात्र सोयाबीन, कांदा, वांगी व कपाशी या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.