वरुणराजाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ७ जूनचा मुहूर्त साधत पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. बीड शहरासह परळीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात वादळी वाऱ्याने पावसाला सुरुवात झाली.
मे महिन्यातील उन्हामुळे अंगाची लाही लाही झालेला प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना ७ जून रोजी पावसाने दिलासा दिला.  सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारी परळी शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.  बीड शहर आणि परिसरातही पावसाला सुरुवात झाली. तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. पहिल्याच पावसात नाले तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले.  परळी, बीड, केजसह गेवराई तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. माजलगावमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे पत्रे उडाले. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसाने हजेरी लावली. ७ जून रोजीच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळाशी दोन हात करणारा शेतकरी पावसामुळे सुखावला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. पावसाला वेळेवर सुरुवात झाल्यामुळे आणखी दोन ते तीन दिवसात चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.
वादळी वाऱ्यात लाखोंचे नुकसान
वार्ताहर, उस्मानाबाद
मागील तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तालुक्यातील मसला खुर्द, पांगरधरवाडी, गंजेवाडी, सावरगाव आदी गावांच्या ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून तसेच कडब्याच्या गंजी भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
तुळजापूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह मागील दोन दिवसांत सायंकाळच्या सुमारास पावसाची हजेरी लागत आहे. तालुक्यात विविध ठिकाणी कमीअधिक प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने मसला खुर्द भागात वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने १० शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून जाऊन घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच भालचंद्र नरवडे या शेतकऱ्याचे या पावसात दोन एकर पपईच्या बागेचे नुकसान झाले. विद्युतवाहिन्या पडल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला.  
उस्मानाबाद तालुक्यातील मुळेवाडी येथे आंब्याचे झाड अंगावर पडल्याने गाईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुळेवाडी येथील मुरलीधर मुळे यांच्या गट नंबर ३२ मध्ये ही घटना घडली.