गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याच्या संशायवरुन अटक करण्यात आलेल्या कर्नाटक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यानेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याची सुत्रांची माहिती आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

एसआयटीच्या सुत्रांनुसार, 23 जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या 50 वर्षीय राजेश बनगेरा याच्यावर तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजेश बनगेरानेच दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना प्रशिक्षण दिलं होतं.

सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांना राजेश बनगेराचा फोटो दाखवला असता त्यांनी ओळख पटवली आहे. त्यानेच बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याची माहिती त्यांनी दिली असल्याची माहिती कर्नाटक एसआयटीकडून मिळाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विचारवंत हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवर होते. ज्यासाठी राजेश बनगेराने जवळपास 50 तरुणांना प्रशिक्षण दिलं होतं. यामध्येच सचिन अंधुरे आणि शरद कळसकर यांच्यासह गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयित परशुराम वाघमारे आणि गणेश यांचा समावेश होता. रमेश बनगेराकडे दोन परवाना शस्त्र असून कराटेत ब्लॅक बेल्ट असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

हत्येचा कट रचण्याचा संशय असणाऱ्या अमोल काळेने महाराष्ट्र आणि कर्नाटकात अनेक तरुणांची भर्ती केली होती. या सर्वांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी राजेश बनगेरावर असल्याचा आरोप एसआयटीने केला आहे. अमोल काळेचा दाभोलकरांच्या हत्येत सहभाग असल्याचा संशय आहे. अमोल काळे आणि विरेंद्र तावडे यांनीच मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचं बोललं जात आहे.

एसआयटीने केलेल्या तपासात राजेश बनगेराने गोविंद पानसरे आणि एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांनाही प्रशिक्षण दिलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे मारेकरी वेगळे असल्याची माहिती आहे. राजेश बनगेरानेच चारही हत्यांसाठी काडतुसं पुरवली असल्याचा संशय आहे.