राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेनंही आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेकडून पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एप्रिल २०१९ मध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवेसेनेकडून त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसेनेतील इच्छुक असलेल्या दिग्गजांना डावलून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसत आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरै, दिवाकर रावते यांची नावं शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चर्चेत होती.

आणखी वाचा- काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राजीव सातव?

दुसरीकडे भाजपाने देखील आपला तिसरा उमेदवार निश्चित केला आहे. उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांच्यानंतर आता डॉ.भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, या पैकी उदयनराजे भोसले व रामदास आठवले यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १३ मार्च (उद्या) आहे. संख्याबळानुसार महाविकासआघाडीचे चार तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.