रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘उभाटी वखर’ मारून झालेले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी आता रान तयार असल्याने पूर्वतयारी झालेली आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दानवे यांचे शनिवारी जालन्यात आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित असून विधिमंडळ अधिवेशनापूर्वी तो होणार आहे. या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, की महाराष्ट्र प्रदेश भाजपची बैठकच लोकसभा निवडणुकीनंतर झालेली नाही आणि त्यामुळे हा विषय आमच्यासमोर आलेला नाही.

नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ झाल्यानंतर घेतलेल्या विविध निर्णयांचा तपशील देऊन दानवे म्हणाले,की गेल्या पाच वर्षांतील जनहिताच्या कामांमुळेच जनतेने मोदींना भरभक्कम जनादेश दिला आहे. जालना शहर आणि जिल्ह्य़ाच्या विकासासाठी आपण मोठा निधी आणला असून आवश्यकतेनुसार आणखी निधी आणण्याचीही आपली तयारी आहे. एकेकाळी गरिबी हटावचा नारा देणाऱ्या काँग्रेसलाच मतदारांनी आता गरिबी आणली आहे. जनतेनेच काँग्रेसला मुक्त केले आहे. विरोधकांजवळ निवडणुकीत राफेलशिवाय दुसरा मुद्दा नव्हता आणि त्या संदर्भातही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आलेला आहे, असेही ते म्हणाले.

तीन महिने परदेश दौरे नको

तीन महिने परदेश दौरे करू नयेत, जास्तीत जास्त हजेरी मंत्रालयात लावावी, सत्काराचे कोणतेही मोठे कार्यक्रम घेऊ नयेत, खात्याचा कारभार लोकोपयोगी आणि काटकसरीचा असावा, इत्यादी सूचना पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना केल्या आहेत, असे दानवे यांनी सांगितले.

तो निर्णय राष्ट्रपतीभवनाचा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंडळ शपथविधीच्या वेळी पाचव्या रांगेचा पास देण्यात आल्याने ते तेथे हजर राहिले नाहीत. यासंदर्भात विचारले असता दानवे म्हणाले,की राष्ट्रपती भवन आणि सरकार या संदर्भात ‘प्रोटोकॉल’ ठरवते. मी प्रदेशाध्यक्ष असलो तरी सरकारमधील ‘प्रोटोकॉल’मुळे अनेकदा मंत्री व्यासपीठावर आणि मी खाली बसलेलो आहे.