19 February 2019

News Flash

अतिरिक्त उसावर कच्ची साखर, इथेनॉलचा उतारा!

अपेक्षित साखर उत्पादन ३५५ लाख टन गृहीत धरून एकूण साखरेचा साठा ४५५ लाख टन राहणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर, लातूर

गेल्या दोन वर्षांत साखरेचे विक्रमी उत्पादन भारतात होत असून जगात साखर उत्पादनात पहिला क्रमांक असलेल्या ब्राझीललाही भारत मागे टाकेल असे चित्र आहे. या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे भाव पडून शेतकरी अडचणीत येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर कच्ची साखर व बीहेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन याचा वापर करण्याची गरज नॅचरल शुगर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी व्यक्त केली.

२०१६-१७ च्या हंगामात देशात २०३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले तर २०१७-१८ च्या हंगामात ३२० लाख टन उत्पादन झाले. एका वर्षांत ११७ लाख टनाचे साखर उत्पादन वाढले. महाराष्ट्रात २०१६-१७च्या हंगामात ४२.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले, तर २०१७-१८ मध्ये ते १०७ लाख टन झाले. २०१८-१९ च्या गळीत हंगामात देशभरात ३५५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल व जगात पहिल्या क्रमांकाचा साखर उत्पादन करणारा देश म्हणून भारताची नोंद होईल. महाराष्ट्रातही ११५ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

देशांतर्गत दरवर्षी सरासरी २५० लाख टन साखर वापरली जाते. अतिरिक्त साखर शिल्लक राहते. गतवर्षीची १०५ लाख टन साखर शिल्लक आहे. केंद्र शासनाने साखर निर्यातीसाठी अनेक योजना जाहीर केल्या असल्या तरी त्याला कारखान्याकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. २० लाख टन सक्तीची निर्यात करावी असे शासनाचे धोरण होते, मात्र जेमतेम पाच लाख टन साखर निर्यात झाल्याचा अंदाज आहे. आगामी वर्षांत ही स्थिती राहिली तर ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदार दोघेही अडचणीत येणार आहेत. पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.

यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सुरुवातीचा साठा १०० लाख टन आहे. अपेक्षित साखर उत्पादन ३५५ लाख टन गृहीत धरून एकूण साखरेचा साठा ४५५ लाख टन राहणार आहे. देशातील साखरेचा वापर २५५ लाख टन धरून २०० लाख टन साखर शिल्लक राहते. २०१९-२० च्या हंगामासाठी १०० लाख टन साखर शिल्लक ठेवली तरीदेखील १०० लाख टन अतिरिक्त साखर होणार आहे. साखरेचे अतिरिक्त उत्पादन कमी केल्याशिवाय बाजारपेठेतील साखरेचे भाव स्थिर ठेवता येणार नाहीत.

गेल्या तीन वर्षांपासून बाजारपेठेत साखरेचे दर सातत्याने घसरत आहेत. साखरेला बाजारात मुळीच मागणी नाही, त्यामुळे ती विकली जात नाही, त्यामानाने कच्च्या साखरेला आशियाई देशातून चांगली मागणी असून ब्राझीलमधून ही साखर आयात केली जाते. आशियाई देशांशी भारताचे वाहतूक अंतर ब्राझीलच्या मानाने फार कमी आहे, त्यामुळे ब्राझीलपेक्षा भारतातील साखर आपण स्वस्तात देऊ शकतो. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यातील साखर कारखान्यांनी पहिले तीन महिने कच्च्या साखरेचे उत्पादन करावे. कारखाने ते बंदरापर्यंतचे अंतर कमी असल्याने वाहतुकीचा खर्च कमी होईल. सुरुवातीचे दोन, तीन महिने सरासरी साखरेचा उतारा कमी येतो, मात्र कच्ची साखर उत्पादन केल्यास अर्धा टक्का साखर उत्पादनात वाढ होते, शिवाय उत्पादन खर्चही प्रतिक्विंटल १५० ते २०० रुपये कमी लागतो.

देशातील किमान ५० टक्के साखर कारखान्यांनी पहिले तीन महिने कच्च्या साखरेचे उत्पादन केल्यास ५० ते ६० लाख टन कच्ची साखर उत्पादित होईल व ती १०० टक्के निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने सध्या चालू असलेल्या सक्तीच्या साखर निर्यात अनुदान योजनेत दिले जाणारे प्रतिटन ५५ रुपये वाढवून १०० रुपये दिल्यास साखर कारखान्यांनाही परवडेल. कच्च्या साखर उत्पादनामुळे पांढऱ्या साखरेच्या उत्पादनात घट होईल. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी केंद्र सरकारने अनेक क्रांतिकारी पावले उचलली आहेत. मोलॅसिसपासून बनणाऱ्या इथेनॉलला पाच रुपये लिटरने दर वाढवून दिलेला आहे. त्यामुळे सध्याच्या साखर दराच्या तुलनेत बीहेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करणारे कारखान्यांना परवडणारे आहे.

बीहेवी मोलॅसिस इथेनॉलसाठी वापरल्यास दीड टक्का पांढरी साखर उत्पादन कमी होते. साखर कारखान्यांनी त्यांच्याकडे डिस्टलरी असल्यास इथेनॉल तयार करावे, अन्यथा बीहेवी मोलॅसिस इतर कारखान्यांना विकावे. बीहेवी मोलॅसिसच्या उत्पादनामुळे आगामी हंगामातील ३० लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल. इथेनॉलच्या उत्पादनात टनामागे १०० लिटरने वाढ होईल, त्यामुळे कारखान्यांना हा निर्णय परवडणारा राहील.

साखर कारखान्यांनी आगामी वर्षांत कच्च्या साखरेचे उत्पादन व बीहेवी मोलॅसिस याद्वारे ९० लाख टन पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी करणे शक्य होईल, त्यामुळे साखरेचे भाव स्थिर राहून ऊस उत्पादकांना वाढीव एफआरपीप्रमाणे पैसे देणे साखर कारखान्यांना शक्य होईल. ‘बल गेला अन् झोपा केला’ अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठीच वेळीच साखर उद्योगातील मंडळींनी काळाची पावले ओळखून धोरणे ठरवली पाहिजेत, असेही ठोंबरे म्हणाले.

बीहेवी मोलॅसिस म्हणजे काय?

सध्या साखर कारखाने जे इथेनॉल तयार करतात त्या मोलॅसिसला सीहेवी मोलॅसिस म्हटले जाते. अशा मोलॅसिसमध्ये साखरेचे प्रमाण केवळ दीड टक्का असते. एक टन मोलॅसिसपासून २५० लिटर इथेनॉलचे उत्पादन होते. कच्ची साखर तयार झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बीहेवी मोलॅसिस तयार होते. त्यात साखरेचे प्रमाण अडीच टक्के असते, मात्र अशा मोलॅसिसपासून इथेनॉलचे उत्पादन घेतल्यास २५० टनऐवजी एका टनाला ३५० लिटर उत्पादन मिळते. केंद्र शासनाने बीहेवी मोलॅसिससाठी लिटरमागे पाच रुपये दरही वाढवून दिले आहेत, यामुळे पांढऱ्या साखरेच्या उत्पादनात घट होईल, शिवाय इथेनॉलच्या निर्मितीत वाढ होईल.

First Published on September 11, 2018 1:07 am

Web Title: raw sugar ethanol need to produce from sugarcane