कयाधू नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचे काम करू, असे माजी खासदार शिवाजीराव माने यांनी जाहीर केले होते. शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे यांनी महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची जाहीर ग्वाही लेखी पत्राद्वारे दिली असल्याने मानेंच्या भूमिकेकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीचा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यास माजी खासदार शिवाजी माने बंडखोरी करून निवडणूक लढविण्याची चर्चा सात-आठ महिन्यांपासून होती. त्यांनी गेल्याच आठवडय़ात बसपा प्रदेशाध्यक्षाची नांदेड येथे भेट घेतली व लगेच दुसऱ्या दिवशी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चासुद्धा केली होती. परंतु माने यांनी निवडणूक लढविण्याच्या मुद्दय़ावर माघार घेतली आणि इतर पक्षात न जाण्याचा निर्णय घेतला. परंतु शासनाने मंजूर केलेल्या कयाधू नदीवरील बंधारे बांधण्याचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन जो पक्ष देईल, त्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची भूमिका जाहीर केली.
मानेंच्या या आवाहनाला सेना उमेदवार सुभाष वानखेडे यांनी लेखी पत्राद्वारे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. कयाधूवरील बंधारे पूर्ण होणे आवश्यक होते, मात्र, आमचे सरकार नाही. त्यामुळे तीव्र इच्छा असतानाही अनुशेषातून मार्ग काढता आला नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यास हा प्रश्न तातडीने सोडवू, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. असे आश्वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले तर विचार करू, असे माने यांनी यावर म्हटले आहे.