ज्या उद्देशपूर्तीसाठी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, त्याला संचालक मंडळाकडून हारताळ फासला जात आहे. संचालक मंडळाने अनेक गरकारभार केल्याचे नांदेड येथील साखर सहसंचालकांनी चौकशी अहवालात नमूद केले आहे. पुणे येथील साखर आयुक्तांकडे हा अहवाल सादर केला असून, सहकार कायद्यांतर्गत कारखान्यावर कारवाई करण्याची शिफारसही सहसंचालकांनी केली आहे.
नांदेड साखर सहसंचालकांनी विविध आठ तक्रारींसंदर्भाने उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखान्याची चौकशी केली. यात माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सहकारमंत्र्यांना दिलेल्या पत्राचाही समावेश आहे. त्यावरून कारखान्याच्या संचालक मंडळावर ७ वेगवेगळे गंभीर आरोप ठेवत सहसंचालकांनी कारखान्यावर कारवाईची शिफारस केली आहे. २०११-१२ चा गाळप हंगाम कारखान्याने केला नाही. ३ ऑक्टोबर २०१३ रोजी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यानंतरही कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत. सन २००६ ते २०१० या कालावधीतील गरव्यवहाराबाबत विशेष अहवालातील शिफारशींवरून कलम ८३ खाली कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने चौकशीसाठी अत्यावश्यक दस्तावेज संबंधितांना उपलब्ध करून दिले नाहीत. परिणामी चौकशीचे कामकाज अजून सुरू होऊ शकले नाही. कारखाना व्यवस्थापनाने रेकॉर्ड उपलब्ध करून न दिल्यामुळे सन २०१० ते २०१४ या ४ वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण होऊ न शकल्याचा ठपकाही सहसंचालकांनी ठेवला आहे.
कारखान्याने जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज मोठय़ा प्रमाणात थकविले. १३ जुल २०१२ रोजी कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपली असतानाही अजून तेच कार्यरत आहेत. २२ पकी केवळ १० संचालक कार्यरत आहेत. संचालक कमी झाल्यामुळे संचालक मंडळात दोष निर्माण झाल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे. लेखापरीक्षक सहकारी संस्था व प्रादेशिक साखर सहसंचालक, नांदेड यांनी संयुक्तपणे केलेल्या चौकशीत कारखान्यावर कारवाईचा अभिप्राय नोंदविला.