नाशिकमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेवर चोरांनी दरोडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमूण शाखेची तिजोरी फोडून चोरट्यांनी एकूण १९ लाख ३८ हजार रुपये पळवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास तीन हजार लोकवस्तीच्या या गावाच्या मध्यवर्ती भागात बँकेची शाखा आहे. बँकेच्या मागील बाजूस शेती आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक शेतकऱयांना बँकेच्या खिडक्या तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेची सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचा फायदा घेऊन चोरांनी खिडक्या तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीचे लॉकर वितळवून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. घटनास्थळी बँकेचे अधिकारी आणि पोलीसांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.