सद्य:स्थिती अहवालाबाबत उत्सुकता

राखी चव्हाण, लोकसत्ता

नागपूर : देशभरातील व्याघ्र प्रकल्पावर नियंत्रण ठेवणारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) ही एकमेव संस्था आहे. मात्र, पर्यटनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या घसघशीत महसुलाच्या लोभापोटी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने प्राधिकरणाच्या नियमांचे गेल्या काही वर्षांत तीनतेरा वाजवले. त्याचे विपरीत परिणाम महाराष्ट्रातील व्याघ प्रकल्प आणि अभयारण्यात दिसून आले आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर प्राधिकरणही जागे झाले असून, पर्यटन नियमनविषयक स्थिती अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी संबंधित व्यवस्थापनाला दिले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत हा पेटारा उघडला जाणार आहे. यातून नेमके  काय बाहेर पडणार, याकडे लक्ष लागले आहे.

व्याघ्र प्रकल्प पर्यटनाची दिशा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ठरवून दिली आहे. प्राधिकरणातील मार्गदर्शक तत्त्वानुसारच पर्यटनाची आखणी करावी लागते. मात्र, ही मार्गदर्शक तत्त्वे धुडकावून लावण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहिले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटना, उमरेड-करांडला अभयारण्य आणि अलीकडेच टिपेश्वर अभयारण्यात अतिपर्यटनाचे दुष्परिणाम दिसून आले आहेत आणि यापुढेही येत राहतील. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील अतिपर्यटन वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. पर्यटनाचा एवढा अतिरेक झाला आहे की पर्यटनासाठी होणाऱ्या नोंदणीत आता खासगी पर्यटक कं पन्यांची लुडबुड वाढली आहे. सहजसाध्य होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे श्रीमंत पर्यटक वाटेल तेवढे पैसे मोजायला तयार असतात. परिणामी खासगी पर्यटक कं पन्या स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांना हाताशी धरून व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यात घुसखोरी करत आहेत. टिपेश्वर अभयारण्यातील एका महिला वनरक्षकामुळे आगाऊ आरक्षणाच्या पावतीत केलेली खोडाखोड उघडकीस आली. यापूर्वी असे प्रकार कित्येकदा घडले असतील. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जिप्सीने वाघाची वाट अडवण्याचा प्रकार अलीकडेच समोर आला. यापूर्वीही कित्येकदा या व्याघ्र प्रकल्पात असे प्रकार घडले आहेत. उमरेड-करांडला अभयारण्यात वाघ जिप्सीपर्यंत येऊन पोहोचला होता. अशा वेळी वाघाने हल्ला के ला आणि त्यात पर्यटक मृत्युमुखी पडला तर जबाबदारी स्वीकारणार कोण? पर्यटनादरम्यान नियम पाळले जातात किं वा नाही हे पाहण्यासाठी अभयारण्याच्या आत कोणतीही व्यवस्था नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पर्यटनाच्या निवडीपासून तर नियोजन, विकास, अंमलबजावणी आणि देखरेखीसाठीसुद्धा काही नियम आखून दिले आहेत. व्याघ्र संवर्धनासाठी प्राधिकरणाने ज्या योजना आखल्या आहेत, त्याची उपाययोजना म्हणून पर्यटन आराखडा तयार करण्याबाबत ही मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेतली जातात. देखरेख यंत्रणा, पर्यटन क्षेत्रे आणि त्याची वहन क्षमता आदीचा पर्यटन योजनेत समावेश आहे. याच निकषावर गेल्या सात-आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे पर्यटन अवलंबून असले तरीही ते निकष पायदळी तुडवले जातात. या पर्यटन मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आवश्यक असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला आता जाग आली आहे. त्यामुळेच सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्र संचालकांना त्यांच्या व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन नियमनविषयक स्थिती अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील पर्यटनाची स्थिती पाहता या अहवालाकडे आणि त्यावरील प्राधिकरणाच्या प्रतिक्रि येकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.