खारपाणपट्टय़ातील जळगांव जामोद, संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यांमधील अनेक गावातील क्षारयुक्त पाणी नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. सातपुडा खोऱ्यात व पूर्णेच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या या गावांमध्ये गेल्या तीन वर्षांत क्षारयुक्त पाण्यामुळे किडनी आणि पोटाच्या दुर्धर आजाराने गेल्या तीन वर्षांत १०० पेक्षा अधिक बळी गेले आहेत. हजारो लोक किडनी व पोटाच्या विकारांनी त्रस्त आहेत. यासाठी आवश्यक त्या शुध्द पाणीपुरवठा, आरोग्य विषयक सुविधा व औषधोपचार, दुर्धर रोगासाठी भरीव आर्थिक मदत या उपाययोजना होतांना दिसत नाहीत. त्यामुळे किडनी व पोटविकारांनी ग्रस्त झालेल्या रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
पिंपळगाव काळे, मडाखेड, जामोद, संग्रामपूर, सोनाळा, बावनबीर, वरवटबकाल, मनसगांव, आडसूळ या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये क्षारयुक्त पाण्यामुळे हजारो ग्रामीण नागरिकांना किडनी व पोटाच्या व्याधी जडल्या आहेत. या परिसरात मूतखडयाचे पाच हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत. खारपाणपट्टयात क्षारयुक्त पाणी जीवघेणे ठरत असून शुध्द पाण्यासाठी उपाययोजनांना अतिशय विलंब लागत आहे. या गावांना शुध्द व क्षाररहित पाणीपुरवठा करण्याचे आदेश शासनाने वेळोवेळी दिले. मात्र प्रत्यक्षात परिणामकारक अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे किडनी बळी व ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज मरे त्याला कोण रडे अशा पध्दतीची शासकीय कार्यपध्दती असून याचा राज्यशासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय गांभिर्याने विचारच करायला तयार नाही.
खारपाणपट्टयातील गावांना जोपर्यंत क्षाररहित व शुध्द पेयजल पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत किडनी रोग बळी व रोगग्रस्त रूग्णांची संख्या कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. किडनीग्रस्त रोग्यांची डायलेसिससाठी शेगांव, बुलढाणा व अकोला रूग्णालयात व्यवस्था आहे. त्याठिकाणी रूग्णांना उपचारार्थ पाठविले जाते. मात्र किडनी व्याधीने ग्रस्त झालेले रूग्ण वाचण्याची कमी शक्यता असते. त्यामुळे मुळ समस्या सोडविण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. या प्रश्नावर दूरगामी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2013 12:57 pm