सांगली : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या (सोमवारी) सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

सांगली येथील गेस्ट हाउस येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बठकीनंतर ते बोलत होते. या बठकीला जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, संजय बेले, संदीप राजोबा आदी उपस्थित होते. ते म्हणाले, की या मोर्चास सोमवारी सकाळी दहा वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून प्रारंभ होणार आहे. वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करूनही वीज बिल माफी दिलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. त्याचबरोबर गेली दोन महिने झाले, दिल्लीमध्ये देशभरातील शेतकरी कृषी कायदे त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी ठिय्या मारून बसले आहेत, मात्र मोदी सरकार सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपू पाहतेय.

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली ते कोल्हापूर असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.