करोनामुळे देशातील स्थिती गंभीर असून, यावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचं दोन दिवसांचं अधिवेशन बोलवावं, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. त्याचवेळी आपण संजय राऊत यांच्यावर पुस्तकही लिहित असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी करोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असं ट्विट आज सकाळी केलं आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे. सगळीकडं नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असं त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणं अचूक आहे, पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.

“संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती, तर तसे करणं योग्य झालं असतं. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचं अधिवेशन आयोजित करणं योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचं आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा. संजय राऊतांबद्दल काय बोलायचं. मी आता शरद पवारांवर पीएचडी करतोय, अजित पवारांवर एमफिल आणि संजय राऊतांवर पुस्तक लिहितोय. ते वर्णन करण्यापलिकडचं व्यक्तिमत्व आहे,” असा टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला.