कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपामध्ये शाब्दीक युद्ध रंगल आहे.

दरम्यान, आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. “बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा आणि एखाद्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक आहे. कारण मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही,” असं सांगत फडणवीस म्हणाले.

भाजपाने फालतू गप्पा मारू नये

देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र भाजपाने फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव महाराष्ट्राचेचं आहे की नाही, एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. कुणाचा काय अहंकार आहे, हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे, असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता, हे ११ कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या,”

हेही वाचा – मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही, हा संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव; फडणवीस संतापले

अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच

यावेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्र भाजपाकडून दोन अपेक्षा व्यक्ता केल्या आहेत. यामध्ये पहिली बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारका समोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा, तर दुसरी बेळगाव पालिका महाराष्ट्रात विलीन होण्याबाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, हे मंजूर आहे का? अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराचं!, असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपाला दिले आहे.