News Flash

पंतप्रधानांनी एवढं सांगितलं तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल; संजय राऊत यांचा सल्ला

"महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये"

संग्रहित छायाचित्र

राज्यात पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीबरोबरच राज्यात करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध मुद्यांवरून भाजपा नेते ठाकरे सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. देशात निर्माण झालेल्या करोना परिस्थितीकडे लक्ष वेधत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर टीकेचा बाण डागला आहे. राज्यातील नेत्यांनाबरोबरच संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींनाही सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून भाजपाकडून केल्या जाणाऱ्या मागण्यांवरून निशाणा साधला आहे. राऊत यांनी दिल्ली व राज्यातील करोना परिस्थितीकडे भाजपा नेत्यांचं लक्ष वेधलं आहे. “दिल्लीत करोनाची दुसरी लाट आली आहे, पण ही तिसरी लाट आहे असे जाणकार सांगतात. बुधवारी मी दिल्लीत होतो. त्या चोवीस तासांत कोरोनाचा स्फोट झालेला मी पाहिला. एका दिवसात साधारण साडेसात हजार करोना रुग्ण झाले. त्या चोवीस तासांत १५० म्हणजे सर्वाधिक मृत्यू झाले. हे सर्व का घडले, तर दिल्ली सरकारने सर्व काही उघडण्याची घाई केली. त्या फाजील आत्मविश्वासातून हे संकट वाढले. राजधानीत करोना संक्रमण वाढत असताना सरकार काय करत होते? ज्यांनी आपल्या आप्तांना या दहा दिवसांत गमावले त्यांना सरकार काय जवाब देणार? असा सवाल आता दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला विचारला. दिल्लीत पुन्हा ‘लॉक डाऊन’ची तयारी सुरू आहे. बाजार, दुकाने, सार्वजनिक स्थळे व प्रार्थनास्थळे पुन्हा बंद केली जातील. हे का घडले याचा विचार महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी करायला हवा,” असा सवाल राऊत यांनी भाजपाला केला आहे.

“महाराष्ट्रातील भाजपा पुढाऱ्यांनी सध्या ज्या भूमिका घेतल्या आहेत त्या विरोधासाठी विरोध करण्याच्या आहेत. पाच वर्षे ज्यांनी राज्याची निरंकुश सत्ता भोगली त्यांनी किमान नीतिनियमांचे भान ठेवायला हवे. मुंबईत छठपूजेला परवानगी द्यावी या मागणीसाठी भाजपावाले आंदोलन करीत होते. बिहारची निवडणूक भाजपाने जिंकली हे खरे, पण मुंबईतील बिहारी जनतेस छठपूजेच्या वादात ओढण्याचे कारण नाही. छठपूजेसाठी समुद्रकिनारी एकाच वेळी हजारो लोक गोळा होतात व करोना संकटकाळात ते नियमबाह्य आहे. छठपूजा २० नोव्हेंबरला पार पडली, पण गर्दी जमवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांचा होताच. मुंबईत ज्यांनी छठपूजेसाठी आंदोलन केले त्यांनी इतर राज्यांत काय घडले ते पाहायला हवे,” असा टोला राऊत यांनी लगावला.

“महाराष्ट्रातील भाजपा नेते हे कसे विसरतात?”

“भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील त्यांची भूमिका राष्ट्रीय हवी, पण तसे घडताना दिसत नाही. छठपूजा प्रामुख्याने बिहार पिंवा उत्तरेत केली जाते. मुंबईत हे लोण तसे अलीकडे आले. मुंबईत छठ पूजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी द्यावी अशी मागणी भाजपाचे नेते करतात. पण गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेशातील भाजपा सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेची परवानगी नाकारली हे महाराष्ट्रातील भाजपा नेते कसे विसरतात? बिहारमधील बहुतेक सर्व जिल्ह्यात तेथील प्रशासनाने आदेश काढले की, छठपूजा घरच्या घरीच करा. सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणलीच, पण नदीच्या घाटांवर पोलिसांनी घेराबंदी करून ठेवली. रस्त्यांवर वाहनांनी यानिमित्त गर्दी करू नये म्हणून कडक निर्बंध लादले. हे सर्व करताना भाजपा हिंदुत्वविरोधी ठरत नाही, पण महाराष्ट्रात भाजपाची भूमिका वेगळी. मुंबईतील भाजपा नेते जुहू चौपाटीवर छठपूजेसाठी परवानगी मागत होते, ते कोणत्या आधारावर? मुंबईत पुन्हा करोना वाढवून सरकारला बदनाम करायचे हे राजकारण त्यामागे आहे. मात्र त्यात लोकांचे जीव जातात याचे भान ठेवले जात नाही. हे क्रौर्य आणि अमानुषता आहे. सरकारचे काही निर्णय मतभेदाचे विषय ठरू शकतात, पण प्रत्येक निर्णयाला विरोधच केला पाहिजे, प्रसंगी लोकांचे जीव गेले तरी चालतील हे धोरण घातक आहे!,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये”

“महाराष्ट्रात मंदिरे उघडा यासाठी जो गोंधळ घातला तो राजकीय होता. मंदिरे उघडण्याचा निर्णय घेत नाही, त्यामुळे ‘ठाकरे सरकार’ हिंदुत्वाच्या विरोधी असल्याची बोंब ठोकणे हे सरळ सरळ ढोंग आहे. हरयाणात भाजपचे सरकार आहे. तेथे शाळा उघडण्याचा निर्णय घेतला, पण ७२ तासांत पाचशेहून जास्त विद्यार्थी व शिक्षक कोरोनाबाधित झाले. बिहारात विजय मिळवला म्हणून करोनावरही विजय मिळवता येईल असे कोणाला वाटते काय? कोरोनाच्या लढाईशी जे हिंदुत्ववादाचा संबंध जोडत आहेत ते जनतेचे शत्रू आहेत. दिल्लीत पुन्हा लॉक डाऊन करण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्रावर ही वेळ येऊ नये. भाजपसारख्या पक्षांची तशी इच्छा असेल तर ते राज्याचे दुर्दैव! पुन्हा देशाचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा या विषयावर जाहीरपणे काहीच बोलायला तयार नाहीत. बिहार जिंकले, आता प. बंगाल जिंकायचे असे भाजपने ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न, पण खरे संकट कोरोना, घसरलेल्या अर्थव्यवस्थेचे. त्यावर कधी विजय मिळवणार? दिल्लीवर कोरोनाने हल्ला केला आहे. त्याच दिल्लीत राष्ट्रपती व पंतप्रधान मोदी राहतात. त्यांच्या डोळ्यासमोर लोकांचे बळी जात आहेत. एखाद्या राष्ट्रीय संदेशात स्वपक्षीयांना करोनाचे राजकारण थांबवा, एवढे पंतप्रधानांनी सांगितले तरी मोठी राष्ट्रसेवा घडेल,” असा सल्ला राऊत यांनी मोदींना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 8:35 am

Web Title: sanjay raut rokhthok pm narendra modi coronavirus delhi maharashtra situation bmh 90
Next Stories
1 कृषीपंपांची वीज थकबाकी चारपट
2 महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी सातशे रुपये किलो!
3 ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपवताहेत
Just Now!
X