शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी भावना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अनेक बोलून दाखवली जाते. पण दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही, याबद्दल कुणीही खात्री सांगू शकत नाही. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ कार्यक्रमात राज ठाकरे यांनाच याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी परमेश्वला ठाऊक असं उत्तर दिलं होतं. राज यांनी दिलेल्या उत्तरावरून आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना राज-उद्धव एकत्र येणार का? यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,”राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा सदस्य नसतो. तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं,” असं म्हणत राऊत यांनी राज यांना टोला लगावला.

संबंधित बातमी : राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतही सहमत; म्हणाले…

राज ठाकरे काय म्हणाले होते…?

‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही वेबमाला ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. या वेबिनारमध्ये १ जून रोजी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी साधला. त्यावेळी राज यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत “परमेश्वरालाच ठाऊक” असं उत्तर दिलं. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न गिरीश कुबेर यांनी केला. तेव्हा, “म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असं म्हणालो,” असं उत्तर राज यांनी दिलं.

हेही वाचा : अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये खूप मोठं काम करूनही नशिबी काय आलं… पराभवच! -राज ठाकरे

पवार-फडणवीस भेटीवर राज ठाकरेंनी केलं होतं ‘बिटविन द लाइन्स’ भाष्य

“महाराष्ट्रातील सरकार आपण बघितलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद हवं म्हणून ते राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर गेले. मग वाटलं की, भाजपा आणि यांचं वाजलं. मध्येच नरेंद्र मोदी आणि त्यांचं बोलणं होतं. आणि ते वेगळ्याच विषयांवर होतं. तब्येत चांगली आहे ना. घरंच सगळं व्यवस्थित आहे ना… बाकी काय सुरू आहे… अशी होते. यात राजकीय मतभेद बाजूला सारून वैयक्तिक मतभेद नसतात हे मानलं तर… आता परवा फडणवीस शरद पवारांना भेटून आले. मग शरद पवार अहमदाबादला अमित शाह यांना भेटून आले. मग अजून कुणीतरी कुणाला भेटलं. मला समजतचं नाहीये. २०१४ पूर्वीपर्यंत एक विरोधी पक्ष आणि एक सत्ताधारी पक्ष असं होतं. आता या क्षणी बघितलं, तर ममता बॅनर्जी हा एक पक्ष आणि भाजपा विरोधी पक्ष…”, असं राज ठाकरे म्हणाले होते.