येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने सवरेत्कृष्ट काव्यसंग्रहास देण्यात येणारा विशाखा पुरस्कार सावंतवाडी येथील कवयित्री शरयू आसोलकर यांना जाहीर झाला आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मु. शिंदे यांच्या हस्ते सोमवार ता, २५ नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी तीन वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी दिली.
आसोलकर यांच्या ‘तुटलेपण पुन्हा बांधून घेताना’ या काव्यसंग्रहाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. द्वितीय पुरस्कार कवी भरत दौंडकर निमगाव म्हाळुंगी (पुणे) लिखीत ‘गोफणीतून निसटलेला दगड’ या काव्यसंग्रहास, तर तृतीय पुरस्कार कवयित्री प्रियंका डहाळे (नाशिक) यांच्या ‘अनावृत्त रेषा’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. द्वितीय आणि तृतीय पुरस्कारार्थीना अनुक्रमे १५ हजार व १० हजार रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याचवेळी सन २०१२ चा विशाखा पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. त्यातील पुरस्कारार्थीमध्ये लक्ष्मण बारहाते ‘पाच बिघे’ (एरंडगाव-येवला), द्वितीय हरीष हातवटे ‘आजीची कविता’ (निमगाव, ता. आष्टी) तर तृतीय पुरस्कार सिन्नरचे कवी किरण भावसार यांच्या ‘मुळांवरची माती सांभाळताना’ या काव्यसंग्रहास दिला जाणार आहे.