पाच वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सोलापुरातील एशियाटिक को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल्स पार्क सोसायटीचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे केंद्राकडून सुमारे शंभर कोटींचे अनुदान मंजूर होऊनदेखील या  टेक्स्टाईल्स पार्कची उभारणी रखडली असताना अखेर यात फसवणुकीचा प्रकारही उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार संस्थेशी संबंधित दोघा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

काँंग्रेसचे माजी नगरसेवक अनिल पल्ली यांचे पुत्र प्रशांत पल्ली व त्यांचे सहकारी शरद मेरगू या दोघांविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात सुमारे ६० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. यासंदर्भात रवींद्र व्यंकटस्वामी इंदापुरे (वय ४८, रा. साखर पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्य़ाची पाश्र्वभूमी अशी, की सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याच्यादृष्टीने कांँंग्रेसचे नेते, तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात टेक्स्टाईल्स पार्क उभारण्याची संकल्पना मांडली होती. त्या वेळी माजी नगरसेवक अनिल पल्ली यांचे पुत्र प्रशांत पल्ली यांच्या नेतृत्वाखाली एशियाटिक को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल्स पार्क सोसायटीमार्फत राज्य व  केंद्र सरकारकडे टेक्स्टाईल्स पार्क उभारणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घातल्याने व प्रस्तावही परिपूर्ण असल्याने तो मंजूर झाला होता. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे शंभर कोटींचे अनुदान मंजूर केले होते. अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे टेक्स्टाईल्स पार्कसाठी विस्तीर्ण भूखंडही उपलब्ध झाला होता. सहकारी तत्त्वावरील या टेक्स्टाईल्स पार्कसाठी इच्छूक व्यक्तींना सभासदत्व देण्यात आले. मे २००९ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पुढे स्वत: सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय इच्छाशक्ती प्रकट केल्याने शासकीय स्तरावर फार अडचणी आल्या नाहीत. संस्थेच्या प्रत्येक सभासदाला टेक्स्टाईल्स पार्कमध्ये एक युनिट मिळणार आहे. त्यापोटी आठ ते दहा हजार चौरस फुटाचा भूखंड आणि त्यावरील बांधकामासह ८ शटरलेस यंत्रमाग मिळणार आहेत, अशी योजना दर्शविण्यात आली होती. त्यावर विश्वास ठेवून रवींद्र इंदापुरे यांच्यासह सुधाकर चिटय़ाल, रामकृष्ण कोंडय़ाल व इतरांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारले. त्यापोटी प्रत्येकी २० लाखांप्रमाणे शुल्क संस्थेत भरले होतम्े. मात्र टेक्स्टाईल्स पार्कची उभारणी रेंगाळली. त्यात प्रगतीही दिसत नसल्याने सभासदांतून  शंका उपस्थित झाली. दरम्यान, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागानेही सोलापूरच्या या टेक्स्टाईल्स पार्क संस्थेच्या उभारणीबाबत कामाचा आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या, परंतु त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. अखेर हा फसवणुकीचा प्रकार असल्याची खात्री पटल्याने सभासदांपैकी रवींद्र इंदापुरे व इतर दोघांनी  ६० लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल केली. या गुन्ह्य़ाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

शरद पवार-सुशीलकुमारांच्या शाब्दिक युद्धाची पाश्र्वभूमी

२०१२ साली झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी काँंग्रेस व राष्ट्रवादी काँंग्रेसची आघाडी न होता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्या वेळी झालेल्या निवडणूक प्रचार सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले राजकीय शिष्यच असलेले काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांना खडे बोल सुनावताना, सोलापुरात वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी टेक्स्टाईल्स पार्क उभारण्याची इच्छाशक्ती शिंदे यांच्याकडे का नाही, असा सवाल उपस्थित केला होता. त्या वेळी शिंदे यांनीही विजापूर वेशीतील जाहीर सभेत शरद पवार यांना चोख प्रत्युत्तर देताना एशियाटिक टेक्स्टाईल्स पार्क सोसायटीच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटीची योजना केंद्राने मंजूर केल्याचे जाहीर करताना तसे मंजुरीचे पत्रच सभेत दाखविले होते. त्या वेळी शरद पवार यांच्या आरोपाविषयी शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. अशी पाश्र्वभूमी लाभलेल्या  एशियाटिक टेक्स्टाईल्स पार्क सोसायटीचे भवितव्यही अंधारात दिसून येते.