प्रसूतिपूर्व लिंग निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून जिल्ह्य़ातील २४ सोनोग्राफी केंद्रांना सील ठोकण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा सोमवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. एस. सोनवणे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. एन. गांडाळ, डॉ. ए. ए. कोकरे, डॉ. सी. एस. ठोकळ, डॉ. एस. एस. डोईफोडे, जिल्हा समन्वयक अधिकारी डॉ. वसीम शेख आदी उपस्थित होते.
जिल्ह्य़ात नोंदणी केलेले सोनोग्राफी यंत्रे २७० आहेत, त्यातील १२७ यंत्रे कार्यरत आहेत तर ११८ यंत्रे विनंतीवरून व ३८ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहेत. कायद्याचा भंग केल्याच्या कारणावरून २४ यंत्रांना सील करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ातील गौरवशाली इतिहासाचे दाखले देताना येथील मुलींची संख्या घटत चालली याची खंत कोणाला दिसत नाही, समाजातील मुलींची कमी होणारी संख्या सामाजिक व नैतिकदृष्टय़ाही गंभीर बाब आहे. यासाठी माहिती-संवाद-शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे, वैयक्तिक स्तरावरही समुपदेशन प्रभावी ठरेल, यासाठी तालुका समुचित प्राधिका-यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक चालू व बंद केंद्रांना अचानक भेट देऊन तपासणी करावी, विशेषत: सुटीच्या दिवशी भेटी द्याव्यात, असे कवडे यांनी सांगितले.