News Flash

कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहीम

कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेणाऱ्या आशासेविकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

|| नीरज राऊत

‘लेप्रसी ऑन व्हील्स’ कार्यक्रम; पालघर जिल्ह्यात तीन वर्षांत ७५० रुग्ण आढळले

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत कुष्ठरोगाचे  साडे सातशेहून अधिक रुग्ण आढळले असून राज्यात कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेणारा राज्यात अव्वल जिल्हा ठरला आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.  या रोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात वर्षभर शोध मोहीम राबवण्याचा दृष्टीने लेप्रसी ऑन व्हील्स या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

कुष्ठरोगाचे (इंक्युबॅशन) उद्वाहन कालावधीचा सरासरी कार्यकाळ दोन ते दहा वर्षाचा असला तरीसुद्धा काही ठिकाणी १७ ते १८ वर्षांनंतरदेखील या आजाराची लागण झाल्याचे रुग्ण आढळले आहेत. सन २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ८३१, २०१८-१९  मध्ये ७३७ तर २०१९-२०  मध्ये ७८३ रुग्ण आढळले आहेत. या वर्षी एप्रिल २०२० पासून चारशेहून अधिक रुग्ण आढळले  आहेत.

कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेणाऱ्या आशासेविकांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. रुग्ण आढळल्यानंतर त्यांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या औषधी गोळीमधून ९३ ते ९९ टक्के आजार बरा होत असल्याचे अभ्यासादरम्यान आढळले आहे. तसेच त्यानंतर अशा रुग्णाकडून आजाराचा संसर्ग होत नाही. उर्वरित आजार बरा करण्यासाठी सहा ते नऊ महिन्याच्या औषधोपचार आवश्यक असेल. त्यामुळे आजाराचा प्रसार आणि शरीचे विकृत रूप रोखण्यासाठी  कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक टप्प्यात औषध उपचार करण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने तपासणी शिबिर आयोजित केली जात आहेत.

नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे माहिती असणे त्याचप्रमाणे हा आजार औषध उपचाराने बरा होतो याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. पूर्वी वर्षातील एका महिन्यात कुष्ठरोग रुग्णांच्या शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात येत असे. सध्या ही मोहीम दररोज सुरू ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आशा सेविका व आरोग्य सेवकांच्या मार्फत रोगाची लक्षण असणाऱ्याचा शोध घेणे व माहिती संकलनाचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे पालघर विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. संतोष चौधरी यांनी सांगितले. विद्यमान वर्षात चारशेहून अधिक कुष्ठरोग रुग्णांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार आरोग्य विभाग सुरू असल्याचे ते पुढे म्हणाले. या आजाराबाबत सक्रियपणे पाळत ठेवणे आवश्यक असून रुग्ण आढळलेल्या ठिकाणी विशिष्ट कालावधीनंतर शोध तपासणी करणे आवश्यक असते. अधिकाधिक कुष्ठरोग रुग्ण आढळून त्यांच्यावर वेळीच उपचार केल्यास या आजाराच्या उच्चाटनासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2020 12:04 am

Web Title: search for leprosy patients akp 94
Next Stories
1 पुराचे पाणी जमिनीत मुरवणार
2 ‘प्रदूषण नियंत्रण’ धाब्यावर
3 देवाचिये द्वारी अनुदानाची निव्वळ हाळी..
Just Now!
X