मध्यप्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या व बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंधित सहा दहशतवाद्यांना पकडण्यासाठी नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहापकी एकाची सासुरवाडी नांदेडची आहे.
सीमीशी संबंधित व खांडवा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले महेबूब इस्माईल खान, अजमदखान रमजानखान, अस्लम मो. अयुबखान, महंमद एजाजोद्दीन मो.अजिजोद्दीन, जाकीर हुसेन बदरुल हुसेन व महमद सलीक हे सहा अतिरेकी सुमारे दीड वर्षांपूर्वी, २०१३च्या ऑक्टोबर महिन्यात कारागृहातून पसार झाले. खांडवा येथील बॉम्बस्फोट, तसेच देशभरातील अन्य दहशतवादी कारवायांत या दहशतवाद्यांचा सहभाग होता.
दीड वर्षांपासून मध्यप्रदेश पोलीस, महाराष्ट्र एटीएस व राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्या वतीने या सहाजणांचा शोध सुरू आहे. परंतु अजून त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले नाही. आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या सहाजणांची १८ छायाचित्रे प्रसिद्ध करून सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएसची राज्यात एकूण १२ कार्यालये आहेत. पकी ६ कार्यालये मुंबई व परिसरासाठी, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी अकोला, नांदेड, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर येथे कार्यालये आहेत. आता सर्वच कार्यालयांमार्फत स्वतंत्र पोस्टर छापण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या सहापकी जाकीर हुसेन ऊर्फ  सादिकखान याची सासुरवाडी नांदेडची आहे. देगलूरनाका परिसरात त्याची सासुरवाडी असल्याने तो स्थानिकांशी संपर्कात आहे का? याची माहिती घेतली जात आहे.
नांदेड एटीएसने या सहाजणांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. जाकीर हुसेनचा नांदेडशी थेट संबंध असला, तरी उर्वरित पाचजणांबाबत काही माहिती मिळेत का? या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. नांदेडात सीमी, दिनदार ए अंजुमन यासारख्या संघटनांचे कार्यकत्रे पूर्वी सक्रिय होते. आता त्यांच्या कारवाया थंडावल्या असल्या, तरी दहशतवादी कारवायांत नांदेडच्या काही तरुणांना पुणे, हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याने नांदेडची यंत्रणा सतर्क असल्याचे सांगण्यात आले. आंध्र-कर्नाटक सीमेवर जिल्हा, तसेच आंध्र प्रदेशात दहशतवादी कारवाया वाढल्याने नांदेड व आंध्र एटीएस संयुक्त माहिती एकत्रित करीत असल्याचे सांगण्यात आले.