एप्रिल-मे आणि डिसेंबरमध्ये सर्वाधिक अपघात
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली व फरिदाबाद येथील दोन संस्थांना या रस्त्याचे सुरक्षाविषयक ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे. त्याद्वारे रस्त्याच्या रचनेमध्ये काही त्रुटी आहेत का, याचाही शोध घेतला जाईल.
या रस्त्यावरील अपघातांचे सविस्तर विश्लेषण करण्याचे काम पोलीस, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि आयआरबी या कंपनीतर्फे करण्यात आले आहे. याबाबत महामार्ग पोलीस दिलीप भुजबळ यांनी सांगितले, की द्रुतगती मार्गावरील बहुतांश अपघात मुख्यत: उन्हाळ्यातील एप्रिल-मे हे महिने आणि हिवाळ्यातील डिसेंबर महिन्यात झाले आहेत.
याशिवाय वेळेनुसार सांगायचे तर सर्वाधिक अपघात पहाटे चार ते सहा या वेळात झाले आहेत. त्या पाठोपाठ दुपारी तीन ते पाचच्या दरम्यानही त्यांचे प्रमाण जास्त आहे. हे अपघात होण्यास ७५ ते ८० टक्के मानवी चुका कारणीभूत आहेत. त्यानंतर यांत्रिक चुकांचा क्रमांक लागतो, उरलेले अपघात नैसर्गिक कारणांमुळे होतात. त्यात धुके, पाऊस, दरडी कोसळणे अशी कारणे आहेत.
बहुतांश वेळा मानवी चुकांचे खापर वाहनचालकाच्या माथ्यावर मारले जाते. मात्र, अपघात होण्यात रस्त्याच्या रचनेतील त्रुटी कारणीभूत आहेत का, याची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच दिल्ली येथील ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किटेक्ट’ या संस्थेला सुरक्षाविषयक ऑडिट करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर फरिदाबाद येथील एका संस्थेचीही या कामी मदत घेण्यात येणार आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.