सोलापूर : महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ लेखक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे शुक्रवारी रात्री सोलापुरात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.

प्रा. बेन्नूर हे अविवाहित होते. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापन करत असतानाच ते सामाजिक चळवळीकडे ओढले गेले. बागवान या मुस्लिम ओबीसी समाजात जन्मलेले प्रा. बेन्नूर  हे असगरअली इंजिनीअर यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या सामाजिक वाटचालीची दिशा बदलली. मुस्लिम आणि दलित समाजाच्या प्रश्नावर ते सक्रिय सहभाग घेऊ लागले.

दलित पँथर चळवळ वाढविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. १९७० च्या दशकात मुस्लिम पुरोगामी चळवळीत सुरुवातीला हमीद दलवाई यांच्यासोबत प्रा. बेन्नूर सहभागी झाले होते. नंतर मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांशी भिडत त्यांनी मुस्लिम ओबीसी चळवळीला वाहून घेतले. मराठी, हिंदी भाषेत त्यांनी १३ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. यातील बहुतांश पुस्तके ही मुस्लिम समाजाचे अंतरंग दर्शविणारी आहेत. दीडशेहून अधिक शोधनिबंधांचे त्यांनी वाचन केले आहे. याशिवाय देशभरात विविध चर्चासत्रे, परिसंवादांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, मुस्लिम ओबीसी आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, महाराष्ट्रीयन मुस्लिम अधिकार आंदोलन आदी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र गॅझेटियर विभाग, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र राज्यशास्त्र परिषद आदी संस्थांच्या कार्यातही त्यांनी सहभाग दिला आहे. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये तज्ज्ञ अभ्यागत म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना छत्रपती शाहू महाराज पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच त्यांच्या ‘हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव’ या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा डॉ. सूर्यकांत घुगरे पुरस्कार प्राप्त झाला आहे.