16 December 2017

News Flash

पोलीस चकमकींनी हादरलेल्या नक्षल दलमची स्वतंत्र दिनदर्शिका

सुरक्षा दलांशी लढणाऱ्या सदस्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आजवर चकमकीत ठार झालेल्या सहकाऱ्यांच्या शौर्याचे

खास प्रतिनिधी, चंद्रपूर | Updated: February 15, 2013 6:19 AM

सदस्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न
सुरक्षा दलांशी लढणाऱ्या सदस्यांचे मनोबल वाढवण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आजवर चकमकीत ठार झालेल्या सहकाऱ्यांच्या शौर्याचे रोज स्मरण करण्याचा सल्ला सर्व सदस्यांना दिला आसून खास छोटेखानी दिनदर्शिका प्रत्येक दलम व कंपनीकडे पाठविली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात सुमारे ८ हजार सशस्त्र नक्षलवादी आहेत. मध्य भारतातील जंगलात तळ ठोकून असलेल्या या नक्षलवाद्यांमध्ये आणखी चैतन्य आणण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने आता वेगवेगळे उपाय अंमलात आणणे सुरू केले आहेत. याच उपायांचा एक भाग म्हणून ही दिनदर्शिका वितरित करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात गडचिरोली जिल्हय़ातील गोविंदगावजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले होते. यात जहाल नक्षलवादी शंकरचा सुद्धा समावेश होता. त्याच्याजवळ पोलिसांना ही दिनदर्शिका सापडली. काही महिन्यापूर्वी पोलिसांनी भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांच्या एका गुप्त अडय़ावर छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती. तेव्हाही अशाच दिनदर्शिका पोलिसांना सापडल्या होत्या.
त्याचा आधार घेऊन पोलिसांनी काही समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडे चौकशी केली असता नक्षलवाद्यांच्या या नव्या योजनेचा उलगडा झाला. दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ठार झालेल्या किशनजीसह अनेक मृत नक्षलवाद्यांची छायाचित्रे या दिनदर्शिकेत टाकण्यात आली आहेत. ठार झालेल्या या नक्षलवाद्यांनी आजवर चळवळीसाठी दिलेल्या योगदानाचा मजकूर या दिनदर्शिकेत नमूद करण्यात आला आहे. चळवळीच्या दृष्टीने शहीद असलेल्या या विरांचे स्मरण प्रत्येक दलमने करावे, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी व सुरक्षा दलांशी युद्ध करावे या अपेक्षेने या दिनदर्शिका वितरीत करण्यात आल्या आहेत. ठार झालेल्या सहकाऱ्यांच्या स्मरणासोबतच प्रत्येक दलमने वर्षांतील कोणते दिवस साजरे करावेत, याचीही माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली
आहे.  
गेल्या २६ जुलैला शहीद दिन, २१ सप्टेंबरला पक्ष स्थापनेचा दिवस, १० फेब्रुवारीला महान धूमकाल दिन, २३ मार्चला भगतसिंग शहीद दिन साजरा करण्यात यावा अशा सूचना या माध्यमातून सर्वाना देण्यात आल्या आहेत. चळवळ महिलांना योग्य सन्मान देते हे दाखवण्यासाठी ८ मार्चला महिला दिन सुद्धा साजरा करण्यात यावा, असेही केंद्रीय समितीने सुचवले आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन्ही दिवस मात्र काळा दिवस म्हणून पाळण्यात यावे असेही केंद्रीय समितीचे म्हणणे आहे. भाकप- माओवादी विचारासांठी लढणाऱ्या जंगलातील सदस्यांच्या वर्तनात सुसूत्रता यावी तसेच त्यांचे विचार युद्धासाठी कायम कटीबद्ध असावेत यासाठीच हा दिनदर्शिकेचा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांना विचारले असता चळवळीत आलेली शिथीलता घालवण्यासाठी असे प्रयोग नक्षलवाद्यांकडून केले जात असल्याचे ते म्हणाले.

First Published on February 15, 2013 6:19 am

Web Title: seperate calendar of naxalist