हिंदी-मराठी वादात स्वतंत्र विदर्भाची मागणी गुरफ टवून टाकू नका. केवळ विदर्भाच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा मानून स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटलीच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन कट्टर विदर्भवादी व नामवंत विधिज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले आहे.
जय महाकाली शिक्षणसंस्थेतर्फे अग्निहोत्री विद्या संकु लात आयोजित व्याख्यानमालेत अ‍ॅड. अणे हे ‘विदर्भाची व्यथायुक्त सत्यकथा’ या विषयावर बोलत होते. याप्रसंगी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री व चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी प्रमुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. अणे यांनी या वेळी स्वतंत्र विदर्भाबाबत स्पष्ट मते मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वीच विदर्भ राज्य वेगळे असावे, असा विचार स्वातंत्र्यपूर्व काळात पुढे आला होता. विदर्भ हे शिलकीचे राज्य आहे. विदर्भात महाराष्ट्रात घालविल्यास विदर्भाचे आर्थिक नुकसान होईल, असे विदर्भवाद्यांनी स्पष्ट केले होते. पण, राजकीय प्रलोभने व विकासाचे गाजर देऊन एकीकृत महाराष्ट्र स्थापन झाला. त्यामुळे विदर्भाची संपन्नता तिकडे गेली व तेथील दारिद्रय़ विदर्भावर आले. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाचे क्षेत्रफ ळ एक तृतीयांश आहे. पण, जनसंख्या एक चतुर्थाश आहे. एकाधिकार योजना विदर्भासाठी घातक ठरली. पण, उसाला फोयदेशीर ठरली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्या वेळी विदर्भात ९० जिनिंग प्रेसिंग होत्या. आज नऊही उरलेल्या नाहीत. राज्यातील एकूण वीजनिर्मितीपैकी ६० टक्के वीज विदर्भात होते. त्यातील वैदर्भीय शेतकरी केवळ ११ टक्केच वापरतो, असेही अ‍ॅड. अणे यांनी निदर्शनास आणले. मराठी-हिंदी हा वाद गैरलागू आहे. कारण, नागपूर विद्यापीठ होण्यापूर्वी आपण अलाहाबाद विद्यापीठाशीच संलग्न होतो. मुंबई-पुण्याशी नाही. हिंदी भाषिकांचा बाऊ करण्याचे कारण नाही. आपण सर्वसमावेशक आहोत. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून विदर्भात हिंदू-मुस्लिम दंगा झाला नाही, हे विदर्भाचे आगळेवेगळे वैशिष्टय़ असून आपली धर्मनिरपेक्षता किती बावनकशी आहे, याचे हे उदाहरण ठरते. विदर्भ व उर्वरित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची तुलना केल्यास आपण सर्व बाबतीत भिन्न असल्याचे दिसून येते. कारण, आपली संस्कृतीच मुळात वेगळी आहे. विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाची दखल ठेवून वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी रेटलीच पाहिजे, असे ठाम मत अ‍ॅड.अणे यांनी मांडले. अध्यक्षीय भाषणातून शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी सर्व साधनसामग्री असणारा विदर्भ कंगाल झाल्याचे स्पष्ट करीत वेगळ्या विदर्भाचे जोरदार समर्थन केले. प्रारंभी संस्था सचिव सचिन अग्निहोत्री यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या घसरत्या स्थितीची आकडेवारीसह माहिती दिली. संस्थेची भूमिका प्रा. प्रफु ल्ल दाते यांनी मांडली. संचालन प्राचार्य स्वरा अष्टपुत्रे, श्रीकांत नायक व प्राचार्य चंद्रकांत कोठारे यांनी केले.