News Flash

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; सरकारला केल्या महत्त्वाच्या सूचना

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. (फोटो -शरद पवार/ट्विटर )

निसर्ग चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (११ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी कोकणमध्ये झालेल्या नुकसानी संदर्भात मदत देण्याविषयी सरकारला सूचना केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्याला मोठा फटका बसला. चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली. त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. कोकण दौरा केल्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मदत करण्याविषयी सरकारला सूचना केल्या.

“या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्यास प्राधान्य देण्यात आले. सर्व भागातील नुकसान पाहता प्रत्यक्षात घटनास्थळी पंचनामे करून त्याची आकडेवारी घ्यायला हवी. यात सर्वप्रथम विद्युत व पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल यावर भर द्यायला हवा. या भागातील फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची निकड मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली. जेणेकरून या भागातील शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची वेळ आल्यास तेदेखील करावे लागेल,” अशी सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

“चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करून, फळबाग लागवड योजनेशी त्याची सांगड घातल्यास हा मार्ग अधिक उपयुक्त ठरू शकेल. या चक्रीवादळात घरे, बागा यांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती-छप्परे आणि झाडे पडल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. हे कचऱ्याचे ढिगारे साफ करून घरे, बागा व दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठे काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर केला जावा,” असंही पवार बैठकीत म्हणाले.

पर्यटन आणि बँकिंग क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज

“पर्यटनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दापोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा वगैरे भागात कोरोनापाठोपाठ चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर बहुतांश भागातील बँका बंद असल्याने नागरिकांच्या हाती पैसे नाहीत. शेती व इतर व्यवसायांचे जुन्या कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी तसेच नवीन कर्ज देण्यासाठी बँका सुरू होणे गरजेचे आहे. तसेच नवीन कर्ज घेताना संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सवलती देता येतील का हे पाहणे जरूरी आहे,” अशी सूचनाही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 7:22 pm

Web Title: sharad pawar meet maharashtra cm uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 सोलापूर : बाजार समितीत कांद्याचे दर आणखी कोसळले
2 कोकणाला मागच्या नऊ दिवसांत कोणतीही मदत मिळालेली नाही-फडणवीस
3 वर्धा : दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठ राज्यातील आरोग्य विज्ञान विद्यापीठात द्वितीय
Just Now!
X