सावंतवाडी नगरपालिकेचा सन २०१३-१४ चा ४ कोटी ६५ लाख ३९ हजार २०० रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी सादर केला. महिलांना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण व सबलीकरणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहराचे बॅनर्स लावून सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चाप लावतानाच त्यावरील कर तीनपट वाढविण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पाणी, स्वच्छता, घरपट्टी आदी कोणताही वाढता कर लादण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी नगर परिषदेचा सन २०१३-१४ चा २६ कोटी २२ लाख ५ हजार २०० रुपये जमेचा तर २१ कोटी ५६ लाख ६६ हजार खर्चाचा अर्थसंकल्प मांडताना ४ कोटी ६५ लाख ३९ हजार २०० रुपये शिलकीचा संकल्प नगरपालिकेने केला असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. नगरसेवकांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
या अर्थसंकल्पात महिलांना स्वरक्षणार्थ उपाययोजना आखण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्युदो कराटेवर भर दिला जाणार आहे. तसेच महिलांना जिम्स् खेळात प्राधान्य मिळावे म्हणून फीमध्ये सवलत देण्यात येणार आहे, असे सांगताना साळगांवकर म्हणाले, महिलांचे सबलीकरण व विकृत शक्तीना तोंड देण्यासाठी शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न नगरपालिका करणार आहे.
या अर्थसंकल्पात चार कोटी ४९ लाख बांधकाम, रस्ते दुरुस्तीसाठी एक कोटी ५५ लाख, नगरविकास २० लाख, इमारत दुरुस्तीसाठी सव्वा लाख, नगरोत्थानमधून विकास १ कोटी २० लाख, शहर सौंदर्यीकरण १८ लाख, स्थानिक विकास ४० लाख, दलित वस्ती सुधारणा ५९ लाख व ८३ लाख, वैशिष्टय़पूर्ण योजनेसाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे नगराध्यक्ष साळगांवकर म्हणाले.
याशिवाय तेरावा वित्त आयोग ९० लाख, काझी शहाबुद्धी हॉलचे मल्टीपर्पजसाठी नूतनीकरण १५ लाख, महिलांना सक्षमीकरणासाठी ज्युडो कराटे आदी स्वरंक्षणार्थ कार्यक्रम, महिला आर्थिक स्वयंरोजगार प्रशिक्षणासाठी १० लाख रुपये तसेच जिम्स आदी खेळासाठी एक वर्षभर महिलांना फीमध्ये सवलत देण्यात येणार आहे. महिलांच्या  सबलीकरणासाठी प्रथमच भर दिला आहे असे साळगांवकर म्हणाले.
नगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबीर, चर्चासत्र व अन्य कार्यक्रमांसाठी दोन लाख, अल्पसंख्याक विकासासाठी १० लाख, पाणी शुद्धीकरण प्रकल्प ५ लाख, वाळणेकोंड धरण गोडबोले गेटसाठी ७४ लाख, वैज्ञानिक सायन सेंटर उभारून विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी ८० लाख, आरोग्य विभागात ४७ लाख ५० हजार, डास निर्मूलन व कंत्राटी काम ३ लाख, आरोग्य औषधे ७ लाख, नरेंद्र डोंगर साठवण टाकी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सावंतवाडी शहरातून रिंगरोड काढला जाणार आहे. राज्य बांधकाम खाते त्यासाठी आर्थिक तरतूद करणार आहे. या ‘बांधा वापरा हस्तांतर करा’ प्रकल्पासाठी नगर परिषदेने दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे असे साळगांवकर म्हणाले.
कत्तलखाना व भाजी मार्केटमधील दर वाढवितानाच शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर्सला १० रुपये चौरस फूट दर आकारला जात होता. आता तीन पट म्हणजे ३० रुपये करण्यात आला आहे. आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता आदी सर्व दर पूर्वीप्रमाणेच असून, कोणतीही वाढ सुचविण्यात आलेली नाही.
समाजमंदिर परिसरात स्वच्छता विभागात कामाला असणाऱ्या कामगारांना मास्टर प्लॅन करून निवासी संकुल उभारण्याचा मानस व्यक्त करतानाच त्याचा फायदा सुमारे ९० जणांना होईल असे नगराध्यक्ष म्हणाले.
सुजल १ कोटी ९ लाख, पश्चिम घाट ८३ लाख, वृक्ष संवर्धन १४ लाख, खेळ व विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे असे बबन साळगांवकर म्हणाले.
या अर्थसंकल्पाचे स्वागत उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, गोविंद पारकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, आनारोजीन पोकळे, योगिता मिशाळ आदींनी मत व्यक्त करून केले. यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, राजू बेग, साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, संजय पेडणेकर, सुधन आरेकर, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, विलासिनी पटेकर आदी उपस्थित होते.