डिसेंबर २००५ पूर्वी ठेकेदारामार्फत साईबाबा संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू झालेल्या व सध्या काम करत असलेल्या ९१६ कामगारांना संस्थान सेवेत नियमित नेमणुका देण्याचा प्रस्ताव गेल्या २० महिन्यांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. या प्रस्तावाला तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यापूर्वी डिसेंबर २००० पूर्वी संस्थानने कंत्राटी कामगार म्हणून दाखल झालेल्या १ हजार ५२ कामगारांना २००९ मध्ये संस्थानच्या कायम सेवेत दखल करून घेतले. जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापनाने राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्याच धर्तीवर डिसेंबर २००५ मधील ९१६ कंत्राटी कामगारांनी कायम करण्यासंदर्भात त्याच व्यवस्थापनाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी निर्णय घेऊन प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठवला आहे. सध्या शासन दरबारी संस्थानची जून २००७ पासूनची १६ तर नगर विकास विभागाची ३ प्रकरणे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. यातच या प्रस्तावाचा समावेश आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दि. ६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून संस्थानच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे.