कोल्हापुरतल्या पावनखिंडीत दारु पिणाऱ्यांना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धरुन चोप दिला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेत हे तरुण सहभागी झाले होते. या तरुणांनी पन्हाळा आणि पावनखिंड परिसरात दारु प्यायलाचा प्रकार उघड झाला. ज्यानंतर शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांना धरले आणि त्यांना चांगलाच चोप दिला.

पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतले हे तरुण पन्हाळा आणि पावनखिंड भागात कारमध्ये बसून दारु पित होते. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजली.ज्यानंतर त्यांनी या ठिकाणी जाऊन तरुणांना फटके दिले. पन्हाळा आणि पावनखिंड भागात दारु पिणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जावा अशी मागणी यावेळी शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी केली.

पावसाळा आला की वर्षा सहलींचं आयोजन केलं जातं या वर्षा सहलींच्या वेळी असे प्रकार घडतात. एकीकडे शिवाजी महाराज की जय या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे मद्यधुंद अवस्थेत तरुण फिरत असतात, कारमध्ये दारु पिण्याचे, धिंगाणा घालण्याचे प्रकार चालतात हे देखील शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि या तरुणांना कारमधून बाहेर काढत जाब विचारला तसेच चांगलाच चोपही दिला. १३ जून १५ जुलै या कालावधी दरम्यान पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. नुकतीच ही मोहीम संपली आहे आणि हा प्रकार समोर आला आहे. एकूण २० ते २५ मद्यपींना कारमधून बाहेर काढून त्यांना चोप देण्यात आला आहे.