केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्यावरुन शिवसेनेने मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा काँग्रेसच्या राजवटीतही झाला नव्हता. मोदी सत्तेवर आहेत आणि राम मंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत असून यावरुन मोदींना राज्य करणे जमले नाही आणि संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही हे स्पष्ट होते’, अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे.

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढला जाणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राममंदिर उभारणीबाबत अध्यादेश काढण्याचा विचार केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत म्हटले होते. तर दुसरीकडे केरळमध्ये शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश केल्यानंतर हिंसाचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपा व संघावर टीकेची तोफ डागली. ‘केरळात मंदिर व हिंदुत्व रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरला आहे, पण अयोध्येतील राममंदिरप्रश्नी ते थंड आहेत. मोदी यांच्या न्यायालयाच्या बतावणीवर ‘लोकभावना’ फेम अमित शहा बोलत नाहीत व सरसंघचालक पुढे जात नाहीत’, असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

शबरीमालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नाही व लोकं स्वीकारतील असेच निर्णय द्यावेत असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेस सुनावले होते. दुसरीकडे अयोध्येतील राममंदिरासाठी न्यायालयाकडे बोट दाखवायचे, पण शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाच्या वादाबाबत न्यायालयीन निर्णय झुगारून द्यायचा. असे हे मृदंगाच्या दोन्ही बाजू बडवणे सुरू असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

केरळमध्ये डाव्या पक्षांची राजवट असल्याने तेथे भाजपा, संघ मित्रमंडळ शबरीमाला मंदिराच्या पवित्र्यासाठी शंख फुंकीत रस्त्यावर उतरले, पण केंद्रात, उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी मोदी आणि योगी यांचे राज्य असल्याने राम मंदिर प्रश्नावर ‘शंख’ मुका झाल्याची बोचरी टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे.

राज्य रामाने दिले, पण रामाचा वनवास संपवायची हिंमत आमच्यात नाही. काँग्रेस सत्तेवर होती म्हणून राममंदिर उभे राहत नव्हते. आता मोदी सत्तेवर आहेत आणि मंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत आहेत. याचा दुसरा अर्थ असा की, तुम्हाला राज्य करणे जमले नाही आणि संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही. म्हणून केरळात एक व अयोध्येत दुसरेच असा तमाशा सुरू असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.