औरंगाबाद : औरंगाबादमधील हिंसाचारात सहभागी असणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना सोडावे, अशी मागणी करत शिवसेनेचे महानगरप्रमुख व माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री ११च्या सुमारास क्रांती चौक पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. पोलिसांना धमकावत टेबलावर काच फोडली. खुर्च्याची फेकाफेक केली आणि सीसीटीव्ही कॅमेराही तोडला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जैस्वाल यांना त्यांच्या घरून सोमवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजीही सुरू होती.

रविवारी रात्री ११च्या सुमारास दंगलीमध्ये सहभागी असणाऱ्या रोहित दुलगंज (वय १९) व सुमीत कांगडा (वय २६) या पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना सोडावे, अशी मागणी जैस्वाल यांनी केली. या दोन्ही आरोपींविरुद्ध घातक शस्त्रे चालवून अपराध केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

या दोघांना पोलीस ठाण्यातून सोडता येणार नाही, असे जैस्वाल यांना सांगण्यात आले. चंद्रकांत निवृत्ती पोटे या पोलीस हवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय बनकर, हवालदार संगीता राजपूत, आशा आडागळे, मंगला सोनवणे, सिंधू गिरी हे क्रांती चौक पोलीस ठाण्यात हजर असताना जैस्वाल यांनी गांधीनगर येथून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना सोडा, तुमचे काम बंद करा आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, असे म्हणत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.

पोलीस फक्त आमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत, असे म्हणत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आणि उद्या शहरात काय घडते बघा, अशी धमकी दिली. या प्रकरणी चंद्रकांत पोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.