महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांचा मानसन्मान ठेवत नाही, तसेच त्यांच्या महत्वपूर्ण कामाच्या फाईल्स अडवून ठेवत असल्याबद्दल चंद्रपूरमधील राजुरा येथील काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी उघडपणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाराजी बोलून दाखविल्याने, आघाडीतील बेबनाव पून्हा समोर आला आहे. शिवसेना मंत्र्यांना समज द्यावी व कॉग्रेसच्या आमदारांचा सन्मान करावा अशी मागणी केल्याने आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची बाब समोर आली आहे.
रविवार १९ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे विदर्भातील महाविकास आघाडीसोबतच्या आमदारांसोबत चर्चा केली. या चर्चेच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.
यावेळी चर्चेत राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी उघड नाराजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखविली. नगरविकास मंत्री शिंदे काँग्रेसच्या आमदारांचा मानसन्मान ठेवत नाहीत, कृपया त्यांना आमदारांचा सन्मान राखण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आमदार सुभाष धोटे म्हणाले, तत्कालीन युती सरकारने नगरपालिकेला मिळालेला निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. सदर निधी पून्हा नगरपालिकेकडे वळता करावा, यासाठी फेब्रुवारी महिन्यात नगरविकास मंत्री शिंदे यांना दोन पत्रं दिली होती. मात्र अजूनपर्यंत काम झाले नाही. काँग्रेस महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष आहे. मात्र अशाही स्थितीत काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत. त्यांना मानसन्मान दिला जात नाही, हे अतिशय चुकीचे आहे. तरी, निधी वळता करण्याचे काम तात्काळ करावे अशी मागणी आमदार धोटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. दोन ते तीन वेळा पत्र दिल्यानंतर आणि तत्कालीन नगरविकास खात्याच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनी सांगितल्यानंतरही काम झाले नाही याबाबतही धोटे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
आमदार धोटे यांची तीव्र नाराजी बघता नगरविकासमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन काम करण्याचे आश्वासन यावेळी दिले. विशेष म्हणजे या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीचा व्हिडीओ आमदार धोटे यांनी स्वत: समाज माध्यमावर सार्वजनिक केल्याने काँग्रेस आमदारांची नाराजी अतिशय उघडपणे समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी धोटे यांनी उर्जामंत्र्यांनी २०० युनिट वीज मोफत द्यावी अशी मागणी करत, पंतप्रधान आवास योजनेचा निधी मिळाला नसल्याचे सांगत व अंबुजा सिमेंट कंपनी शेतकऱ्यांचे पाणी वापरत असल्याबद्दल तसेच कर्जमाफीच्या पुर्नगठणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.