खा. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या शिवसेना नेत्यांच्या सभानंतर कोणाचीही सभा न झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला आता इतर बडय़ा नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा आहे. महायुतीतील घटकपक्ष असतानाही भाजप अजूनही प्रचारात फारसा सक्रिय न झाल्याने प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे, भुजबळांविरुद्ध सतत तोफ डागणारे किरीट सोमय्या या नेत्यांच्या सभा घेतल्यास भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी गंभीरपणे कामाला लागतील, असा शिवसेनेत मतप्रवाह आहे.
ग्रामीण भागातील प्रचारानंतर शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नाशिक शहरात प्रचारास सुरुवात केली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुवतीनुसार प्रचार सुरू ठेवला असला तरी वातावरण निर्मितीसाठी बडय़ा नेत्यांच्या सभा घेण्याची आवश्यकता शिवसैनिकांकडूनच व्यक्त होत आहे. खा. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्यानंतर आता थेट १८ एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्याआधी अभिनेते आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे यांसारख्या स्टार प्रचारकांना रोड शो आणि सभेसाठी बोलाविल्यास ठाकरे यांच्या सभेची वातावरणनिर्मितीही होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत आघाडी असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांना काँग्रेसकडून, तर महायुती असूनही शिवसेनेला भाजपकडून हव्या त्या प्रमाणात साथ मिळत नसल्याचे चित्र आहे. महायुतीत समन्वय नसल्याचा आरोप खोडून काढण्यासाठी भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्याची सूचनाही काही शिवसैनिकांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांपैकी फक्त नाशिक या एकाच जागेवर शिवसेनेचा उमेदवार असून उर्वरित पाचही ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. नाशिकमध्ये प्रचारात भाजपकडून शहराध्यक्षांसह काही ठरावीक नेते प्रचारात दिसतात, परंतु बहुतेक पदाधिकारी, नगरसेवक प्रचारापासून दूरच आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादीलाही मित्रपक्ष काँग्रेसकडून असाच अनुभव येत आहे. काँग्रेस शहर कार्यालयास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे स्वरूप देऊन भुजबळ यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी मोजक्या नेत्यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व नेतेही राष्ट्रवादीच्या प्रचारापासून दूर राहिल्याचे दिसत आहेत.