News Flash

शिवाजी राजे हे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे ‘मॅनेजमेंट गुरू’

कल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी राजाने शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी सैन्याला सक्त ताकीद दिलेली होती. त्यामुळेच त्यांना जाणता राजा म्हटले जाते. आजच्या

| April 3, 2013 03:44 am

कल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी राजाने शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी सैन्याला सक्त ताकीद दिलेली होती. त्यामुळेच त्यांना जाणता राजा म्हटले जाते. आजच्या काळात आपण ‘मॅनेजमेंट गुरू’ हा शब्द वापरतो. परंतु साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज हे खरे मॅनेजमेंट गुरू होते. त्यांचे अष्टप्रधान मंडळ त्याची साक्ष देते, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजय अपरांती यांनी केले. शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर येथील जनता चौकात मराठा-कुणबी पाटील आणि क्षत्रिय मराठा समाज मंडळाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा आधुनिक महाराष्ट्र’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, डॉ. कांतिलाल टाटिया, माजी नगराध्यक्ष अशोक बागूल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल रावल, पं. स. सभापती डॉ. सुरेश नाईक, नगरसेवक प्रा. दत्ता वाघ आदी उपस्थित होते. दिव्याची गरज कुठे आहे, आगीच्या भक्ष्यस्थानी शेतकऱ्यांचा चारा पडू नये, एवढेच नव्हे तर सैन्याने उभ्या पिकातून जाऊ नये, अशा बारीकसारीक गोष्टींची ते काळजी घेत. शेतकऱ्यांना वतने परत करणे, जमिनी देणे याचे सर्व नियोजन ते करीत. कल्याणच्या सुभेधाराच्या सुनेला सन्मानाने परत पाठविणे आणि तिची आईशी तुलना करून गौरवोद्गार काढणे हे त्यांच्या श्रीमंत स्वभावाचे व स्त्रीदाक्षिण्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. सैन्यात आणि अधिकाऱ्यांत सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश होईल हे त्यांनी पाहिले. त्यामुळेच असा राजा पुन्हा होणे नाही, असे डॉ. अपरांती यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक प्रा. डॉ. दत्ता वाघ यांनी प्रास्ताविकात अपरांतीचा परिचय करून दिला. या वेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अनिल भामरे यांनी मराठा कुणबी पाटील समाजातर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ११ हजार रुपये देत असल्याचे जाहीर केल्यावर शहादेकरांनी भरभरून मदत जाहीर केली आणि अवघ्या पाच मिनिटांत तीन लाख ३५ हजारांचा मदत निधी घोषित झाला. जिल्हा पोलिसांनी दोन दिवसांचा पगार, शहादा पोलिसांनी ११ हजार, दीपक पाटील ५१ हजार, जयपाल रावल ५१ हजार, अशोक बागूल, डॉ. कांतिलाल टाटिया व डॉ. सुरेश नाईक प्रत्येकी ११ हजार, शहाद्यातील सर्व नगरसेवक ५१ हजार, जाधव बंधू १५ हजार रुपये याप्रमाणे रक्कम घोषित करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:44 am

Web Title: shivaji raje is the management guru of past 350 years
Next Stories
1 काही महिला संघटनांना लक्ष्मण माने यांचे जास्तच प्रेम- उदयनराजे
2 धुळे व चांदवड येथे लाच स्वीकारताना दोघांना अटक
3 एकतर्फी प्रेमातून नागपूरमध्ये प्राध्यापकाची हत्या
Just Now!
X