शिवराज सिंह, भूपेश बघेल अशी मोठी परंपरा

नागपूर : पूर्व विदर्भातील गोंदिया हा जिल्हा केवळ वनराईनेच नटलेला नाही तर त्याला एक वेगळे राजकीय वलयही लाभले आहे. नुकतेच पायउतार झालेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान असतील किंवा राजकीय क्षितिजावर मुख्यमंत्री म्हणून नव्यानेच उदयास आलेले भूपेश बघेल असतील गोंदियाशी वैवाहिक नाते जुळलेले हे नेते सत्तेच्या शिखरावर राहिले आहेत.

गोंदियाचे जावई असलेले शिवराज सिंह चौहान १५ वर्षांनंतर मध्यप्रदेशातील सत्तेतून पायउतार होतानाच गोंदियाचे मेहुणे असलेले भूपेश बघेल छत्तीसगडचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे गोंदियाने शेजारील राज्यातील सत्तेत आपला सहभाग कायम ठेवला आहे. प्राचीन काळी राजकीय स्थिती भक्कम करण्यासाठी राज घराण्यांमध्ये रोटी बेटी व्यवहाराची परंपरा होती. संबंध बळकट करण्यासाठी अनेक राजघराणे शेजारील राज्यात कौटुंबिक नाते जोडायचे. आधुनिक काळात तशीच स्थिती गोंदियाची आहे. भोगौलिकदृष्टय़ा गोंदिया राज्याच्या  राजकारणातील सत्तेचा केंद्र कधीच होऊ शकला नसला तरी शेजारील मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसोबत गोंदियाचे वेगळे नाते कायम राहिले आहे. मध्यप्रदेशमध्ये १५ वर्षे एक हाती सत्ता राखणारे शिवराज सिंह चौहान गोंदियाचे जावई होते. गोंदियातील मसानी कटुंबाचे जावई असलेले शिवराज सिंह चौहान तेव्हा अनेक कौटुंबिक कार्यक्रमासाठी गोंदियाला यायचे. आता भूपेश बघेल छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले आहेत.

छत्तीसगडमधील रमण सिंह यांच्या सरकारमध्ये सतत १५ वर्षे क्रमांक दोनचे नेते राहिलेले ब्रिजमोहन अग्रवाल गोंदियाचे जावई आहेत. मध्यप्रदेशात अनेक वर्षे शिक्षण मंत्री राहिलेले कृष्णकुमार गुप्ता हे गोंदियाच्याच मोदी कुटुंबीयांचे जावई आहेत.

शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेल्या गौरीशंकर बिसेन यांचे सासर गोंदियाच्या बोरगावचे आहे तर मध्यप्रदेशातील बालाघाटचे खासदार बोधचिन्ह भगत हे गोंदियाच्या कुडावा परिसरातील बिसेन कुटुंबाचे जावई आहेत.