पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला होता. त्यात पंतप्रधान मोदी यांनी कारगिल विजय दिनाच्या घटनांना उजाळा दिला होता. त्याचबरोबर पाकिस्तानबद्दल भाष्य केलं होतं. मोदी यांनी केलेल्या ‘मन की बात’वर शिवसेनेनं टीकेचा बाण सोडला असून, पाकिस्तानबरोबर चीनची आठवण करून दिली आहे. “कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून पाकिस्तानबरोबर झालेल्या कारगिल युद्धाचं स्मरण केलं होतं. त्याचबरोबर पाकिस्तानचा स्वभावच वाईट असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेनं मोदी यांच्या भूमिकेवर सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. “पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक वगैरे करूनही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. यावर पंतप्रधान मोदी यांनी असे लॉजिक मांडले की, ‘पाकिस्तान दुष्ट आहे. दुष्टांचा स्वभाव काही केल्या आपण बदलवू शकत नाही. दुष्ट स्वभावाची माणसे काही कारणाशिवाय कोणाशीही वैर घेतात. वैर घेणे हा त्यांचा स्वभावच असतो. हिंदुस्थानने पाकिस्तानबरोबर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रयत्न केला.’ पंतप्रधान मोदी यांनी सत्य तेच सांगितले. पण हेच ‘मैत्रीचा हात’ प्रकरण चीनच्या बाबतीतही लागू पडते. दुष्टपणा त्यांच्या वाकड्या नजरेतही स्पष्ट दिसतो. पण ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी हे बरे. कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“देशाची जनता मनकवडी…”

“सध्या आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोण पाहत आहे? वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर नक्की कधी देणार आहोत? पंतप्रधान मोदी यांनी तर त्यांच्या ‘मन की बात’मध्ये चीनचे नावही घेतले नाही. देशाची जनता मनकवडी आहे. त्यामुळे लोकांनीच काय ते समजून घ्यावे, असे पंतप्रधानांनी ठरवून टाकले आहे. पाकिस्तानचे कारगिल युद्ध झाले व आमच्या जवानांनी मोठी किंमत मोजून ते जिंकले. म्हणून पाकिस्तानचे संकट संपलेले नाही. पण आता गलवान खोऱ्यात १४ हजार फुटांवर चीन घुसतोय व तेथे तणावाची स्थिती आहे. आपले २० जवान शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याचा बदला आपण घेतला नाही,” अशी टीका शिवसेनेनं मोदींवर केली आहे.