कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणात संशयित म्हणून सनातनचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाड याला अटक झाल्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येऊ लागली आहे. ज्वलंत हिदूत्त्वाचा पुरस्कार करणाऱया शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखामधून या मागणीवर कडवी टीका करण्यात आली आहे. पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण पुरोगामी ढोंगी बाबांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करू नका, असाही टोला शिवसेनेने लगावला आहे.
समीर गायकवाडला संशयित म्हणून कोल्हापूर पोलीसांनी गेल्या आठवड्यात अटक केली. त्यानंतर सनातन संस्थेवर बंदी घालण्याची पुरोगामी लोकांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अग्रलेखातून त्याला विरोध दर्शविला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘‘सनातन’ या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे व अशी मागणी करणारी थोबाडे तीच, तीच आणि तीच आहेत. कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सांगलीतून समीर गायकवाड या तरुणास अटक झाली. गायकवाड हा ‘सनातन’चा साधक आहे. ‘सनातन’च्या अनेक धार्मिक व आध्यात्मिक कार्यात त्याचा सहभाग आहे या कारणास्तव गायकवाडला विनाचौकशी फासावर लटकवा व ‘सनातन’वर लगेच बंदी घाला अशा मागणीची डबडी वाजू लागली आहेत. हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे व स्वत:स पुरोगामी वगैरे म्हणवून घेणार्‍यांचे ढोंग उघडे पाडणारा आहे.’
पानसरेच काय, महाराष्ट्रातील कोणत्याही वृद्ध इसमाची अशी हत्या होणे हे भ्याडपणाचे अमानुष कृत्य आहे. पानसरे यांच्यासारखे लोक हिंदुत्वावर टीकाटिपणी करत असतात व हे लोखंडी घण सोसूनच हिंदुत्वाची मूर्ती घडली आहे, असे लिहून स्वातंत्र्य हे सर्वात जास्त विरोधकांना मिळावे. कारण लोकशाहीत विरोधी विचारांना आवश्यक स्थान मिळायला हवे. म्हणूनच पानसरे, दाभोलकर व कर्नाटकातील कलबुर्गीसारख्या मंडळींची हत्या हे निरोगी समाजाचे लक्षण नाही, असे लिहिण्यात आले आहे.